महामंडळपदाचे आमिष दाखवत 20.25 कोटींची मागणी

यवतमाळात तिघांना अटक, भाजप पदाधिकार्‍याच्या सतर्कतेने भंडाफोड

7 अधिकार्‍यांची बनावट यादी दाखवून केली फसवणूक

यवतमाळ/31 मे- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध महामंडळावर अध्यक्ष आणि सदस्यपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 20 कोटी 25 लाख रुपयांची मागणी करणार्‍या एका आंतरराज्यीय भामट्या टोळीचा यवतमाळमध्ये पर्दाफाश झाला आहे. भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या सतर्कतेमुळे आणि त्यांनी गुप्त कॅमेर्‍याच्या मदतीने गोळा केलेल्या भक्कम पुराव्यांमुळे अवधूतवाडी पोलिसांनी शनिवारी सापळा रचून तीन आरोपींना अटक केली. राजकीय पदांचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचा हा मोठा डाव उघडकीस आल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या खळबळजनक प्रकरणाची सुरुवात 16 मे रोजी झाली. आरोपी लौकिक जगन्नाथ फुलकर याने सर्वप्रथम भ्रमणध्वनीवरील संदेश प्रणालीद्वारे नितीन भुतडा यांच्याशी संपर्क साधला. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी आपले थेट संबंध असल्याचे सांगून त्याने नितीन भुतडा यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या टोळीचा मुख्य सुत्रधार गणेश लालसिंग राठोड याला पुढे करण्यात आले. आरोपींनी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील 42 महामंडळांची एक बनावट अधिकृत वाटणारी यादी नितीन भुतडा यांना पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. या यादीतील कोणतीही तीन महामंडळे निवडून त्यावर राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले अध्यक्षपद किंवा सदस्यत्व निश्चित करून देण्याचे आश्वासन या टोळीने दिले होते.
या मोठ्या राजकीय नियुक्तीच्या बदल्यात टोळीने 20 कोटी 25 लाख रुपयांची अवाढव्य रक्कम मागितली. इतकेच नव्हे तर हा व्यवहार पक्का करण्यासाठी एकूण रकमेच्या पाच टक्के रक्कम म्हणजेच टोकन रक्कम आगाऊ म्हणून देण्याची अट घातली. ही रक्कम दिल्लीला पोहोचताच थेट देशाच्या राजधानीतून नियुक्तीबाबतचा भ्रमणध्वनी येईल, असे आमिषही आरोपींनी दाखवले होते. मात्र, नितीन भुतडा यांना आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवामुळे सुरुवातीपासूनच या व्यवहाराबाबत तीव्र संशय आला. त्यांनी अत्यंत सावध भूमिका घेत आरोपींना थेट नकार न देता, गुप्त कॅमेर्‍याच्या साहाय्याने त्यांच्यातील संभाषण आणि हालचालींचे संपूर्ण चित्रीकरण करून भक्कम पुरावे गोळा केले.नितीन भुतडा यांनी सर्व पुरावे गोळा केल्यानंतर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसांनी शनिवारी अत्यंत गोपनीयतेने सापळा रचून लौकिक जगन्नाथ फुलकर, विश्वजीत सुरेश राठोड आणि मुख्य सूत्रधार गणेश लालसिंग राठोड या तिघांना रंगेहात अटक केली. पोलिसांनी नितीन भुतडा यांनी दिलेले व्हिडिओ आणि इतर तांत्रिक पुरावे आपल्या ताब्यात घेतले आहेत. पोलीस निरीक्षक नंदकुमार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या टोळीचे धागेदोरे इतर राज्यांत किंवा मोठ्या राजकीय वर्तुळात कुठपर्यंत पसरले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
सावधगिरीने उधळला कोट्यवधींचा डाव-दिल्ली कनेक्शनचा खोटा दावा करून मंत्रिपदाचे स्वप्न दाखवणार्‍या भामट्यांनी भाजप पदाधिकार्‍याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयास्पद व्यवहार वाटल्याने त्यांनी गुप्त कॅमेर्‍याच्या मदतीने आरोपींचे बोलणे रेकॉर्ड केले. पोलिसांच्या मदतीने सापळा रचून तीनही आरोपींना गजाआड करण्यात आले असून, त्यांच्याकडील बनावट याद्या आणि व्हिडिओ पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button