कॉपीबाज 26 गुरुजींना घरी पाठविले; बोर्डाची कठोर कारवाई
600 विद्यार्थीही अडचणीत

वाशिम / 18 फेब्रुवारी – जिल्ह्यातील तोरणाळा येथील मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेत घडलेल्या सामूहिक कॉपी प्रकरणामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्र हादरले असून, या प्रकरणी शिक्षण विभागाने कठोर पाऊल उचलत 26 शिक्षक आणि कर्मचार्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
या धक्कादायक घटनेमुळे अमरावती विभागीय मंडळात मोठी खळबळ उडाली असून, 581 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका एकसारख्या आढळल्याने शिक्षण उपसंचालकांनी ही मोठी कारवाई केली आहे. वाशिम जिल्ह्यातील या परीक्षा केंद्रावर सोमवारी बारावीचा भौतिकशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना भरारी पथकाने छापा टाकला. यावेळी तब्बल 600 हून अधिक विद्यार्थी सामूहिकरीत्या कॉपी करताना आढळून आले. विशेष म्हणजे, परीक्षार्थींना कॉपी करण्यासाठी तेथील शिक्षकांनीच मदत केल्याचा गंभीर आरोप तपासणीत समोर आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी स्वतः केंद्राची पाहणी केली असता, तेथे बसण्याची व्यवस्था अत्यंत दाटीवाटीची असल्याचे आणि सीसीटीव्ही यंत्रणा असूनही हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. शिक्षण शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या 26 शिक्षकांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, कॉपी पुरवणार्या रॅकेटचे धागेदोरे शोधण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. आगामी काळात या प्रकरणात आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




