कुर्हाडीने जीवघेणा हल्ला युवक जखमी
जुन्या वादातून टोकाचे पाऊल

अमरावती/10 मे- जिल्ह्यातील दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या जुना धामणगाव येथे जुन्या वादातून दोन तरुणांमध्ये रक्ताळलेला थरार घडला. संतापाच्या भरात आरोपीने फिर्यादीच्या घरात घुसून कुर्हाडीने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात निखिल गजानन मते हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये हा प्रकार घडला. फिर्यादी निखिल गजानन मते (वय 27) हा आपल्या घराचा मागचा दरवाजा उघडून निवांत बसला होता. याच वेळी जुन्या वादाची खुन्नस मनात धरून आरोपी आदित्य गजानन मते (वय 19) हा हातात कुर्हाड घेऊन अचानक घरात शिरला. काहीही विचारण्यापूर्वीच आरोपीने निखिलवर जीवघेणा हल्ला चढवला. आरोपीने निखिलच्या पाठीवर आणि हातावर कुर्हाडीने एकामागून एक अनेक वार केले. स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना निखिलच्या हाताला खोल जखमा झाल्या. या हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निखिलला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. वैद्यकीय तपासणीत निखिलला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत आरोपी आदित्य मते याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 109, 333, 307 आणि 452 नुसार गुन्हा नोंदवला आहे. भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




