उद्या द्विशतकपूर्ती सत्संग सोहळा

राऊळ माय - राऊळ बापू पारायण मंडळाचा भव्य उपक्रम

अमरावती/3 जुलै- स्थानिक सक्रिय सामाजिक आणि आध्यात्मिक संस्था राऊळ माय राऊळ बापू पारायण मंडळ यांच्या वतीने सूत्रपाठ पारायण उपक्रमाच्या द्विशतकीय पूर्ततेनिमित्त रविवार, 5 जुलै 2026 रोजी विशेष सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी 10.30 वाजता शाकुंतल कॉलनी येथील दादाराव महल्ले यांच्या निवासस्थान परिसरात आयोजित केला जाईल. या संदर्भातील सविस्तर माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष अनंतराव तेलखडे आणि सचिव सतीशराव मानकर यांनी दिली.
संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मंडळ वर्ष 2019 पासून समाज प्रबोधन आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी सातत्याने कार्य करत आहे. व्यसनमुक्ती अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, आध्यात्मिक जनजागृती तसेच महानुभाव पंथाचा प्रचार-प्रसार यांसारखे अनेक सामाजिक आणि धार्मिक उपक्रम संस्थेद्वारे नियमितपणे राबविले जातात. याशिवाय कोरोना काळात गरजू कुटुंबांना अन्नधान्य उपलब्ध करून देणे, वैद्यकीय मदत पोहोचवणे आणि संकटग्रस्त लोकांना मदत करणे यांसारख्या सेवा कार्यातही मंडळाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयोजकांनी सर्व भाविक आणि नागरिकांना कार्यक्रमाला उपस्थित राहून हा आध्यात्मिक उत्सव यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. मंडळाचे अध्यक्ष अनंतराव तेलखडे आणि सचिव सतीशराव मानकर यांनी सांगितले की, संस्थेचा उद्देश केवळ धार्मिक उपक्रमांपुरता मर्यादित नसून समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे, नैतिक मूल्यांचे संवर्धन करणे आणि सेवाभावाचा प्रसार करणे हा देखील आहे.

संबंधित बातम्या

Back to top button