अकोला जिल्हा कारागृहात दोन दिवसात दोन कैद्यांचा मृत्यू

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कैद्यांचा नाहक बळी

अकोला /27 मे- स्थानिक जिल्हा कारागृहाच्या काळकोठडीत अवघ्या दोन दिवसांत दोन कैद्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर आणि धक्कादायक घटनेमुळे कारागृह प्रशासनाचा अत्यंत बेजबाबदार आणि ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला असून कैद्यांच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला आहे. एकामागून एक अवघ्या 24 तासांच्या अंतराने घडलेल्या या दोन्ही मृत्यू प्रकरणांमुळे कारागृह प्रशासनावर हलगर्जीपणाचे आणि निष्काळजीपणाचे गंभीर आरोप केले जात आहेत. खुनाच्या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीचा आणि बुलढाणा येथून अकोला कारागृहात आणलेल्या एका वृद्ध कैद्याचा अचानक झालेल्या मृत्यूमुळे कारागृहातील अंतर्गत अनागोंदी कारभार आणि मूलभूत सुविधांचा अभाव आता चव्हाट्यावर आला आहे. सिटी कोतवाली पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या गुन्ह्याच्या प्राथमिक माहितीनुसार, तेल्हारा तालुक्यातील बेलखेड गावचा रहिवासी दीपक रामदास चतरकर (वय 42 वर्ष) याला तेल्हारा न्यायालयाने भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून 22 एप्रिल 2026 रोजी कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले होते. 25 मे 2026 च्या रात्री 8 वाजताच्या सुमारास दीपक चतरकरची प्रकृती अचानक खालावली. यानंतर कारागृह प्रशासनाने घाईघाईने त्याला शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी हलवले. परंतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी दीपक चतरकर याला मृत घोषित केले. या मृत्यूची शाई वाळते न वाळते तोच, दुसर्‍याच दिवशी म्हणजे 26 मे 2026 च्या रात्री साडेसात वाजेच्या सुमारास आणखी एका कैद्याचा मृत्यू झाल्याची दुसरी धक्कादायक घटना समोर आली. प्रल्हाद पांडुरंग रायपुरे (वय 66 वर्ष, राहणार जिगाव, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा) असे या मृत वृद्ध कैद्याचे नाव आहे. त्यांना बुलढाणा सत्र न्यायालयाने कलम 302 अंतर्गत कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले होते. बुलढाणा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव 70 कैद्यांना अकोला जिल्हा कारागृहात हलवण्यात आले होते, त्यामध्ये जिगावचे वृद्ध कैदी प्रल्हाद रायपुरे यांचाही समावेश होता. मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले, परंतु तेथे उपस्थित डॉक्टरांनीत्यांना तपासून मृत घोषित केले. सलग दोन दिवसांत घडलेल्या या दोन्ही मृत्यू प्रकरणांची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून, सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय गवई यांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला आहे. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येत असून, त्याचा अधिकृत वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतरच या कैद्यांच्या मृत्यूचे नेमके आणि खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पाणी शुद्धीकरण यंत्र बंद ?-अकोला जिल्हा कारागृहात कैद्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी बसवलेले पाणी शुद्धीकरण यंत्र (आरो प्लांट) गेल्या अनेक दिवसांपासून पूर्णपणे बंद पडले आहे. कडक उन्हाळ्यात कैद्यांना दूषित पाणी प्यावे लागत असून, प्राथमिक वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्यानेच कैद्यांचे आरोग्य बिघडून त्यांचे मृत्यू होत असल्याचा खळबळजनक खुलासा सूत्रांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button