गझलनवाज भीमराव पांचाळे यांची सुवर्णतुला
आवाजातील गोडवा व गझल गायकीचा 55 वर्षांचा प्रवास

10 एप्रिलला सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शाही नागरी सत्कारl
श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात स्वरांचा उत्सव
अमरावती /6 एप्रिल: मराठी गझलेला जागतिक स्तरावर अढळ स्थान मिळवून देणारे अमरावतीचे सुपुत्र ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांच्या गझल गायकीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या 10 एप्रिल रोजी त्यांचा सपत्नीक भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. अमरावती येथील इलेक्ट्रॉनिक माध्यम संघटनेच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला असून, याप्रसंगी भीमराव दादांची पुस्तकांद्वारे आगळीवेगळी सुवर्णतुला केली जाणार आहे. वयाची 75 वर्षे पूर्ण करूनही आवाजातील तोच गोडवा जपत अखंड 55 वर्षे गझल सेवा करणार्या या महान कलावंताचा गौरव 10 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे संपन्न होईल. या ऐतिहासिक सोहळ्याची अधिकृत घोषणा 6 मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.
इलेक्ट्रॉनिक माध्यम संघटनेचे अध्यक्ष नितेश राऊत यांनी या कार्यक्रमाचे सविस्तर नियोजन मांडले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार असून, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. या सांस्कृतिक महोत्सवासाठी राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गज एकाच मंचावर येणार आहेत. यामध्ये खा. अनिल बोंडे, खा. बळवंत वानखडे, आ. सुलभा खोडके, संजय खोडके, रवी राणा, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी खा. नवनीत राणा, माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे, हेमंत काळमेघ आणि गुणवंत देवपारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. केवळ राजकीयच नव्हे तर प्रशासकीय यंत्रणेतील विभागीय आयुक्त नयना गुंडे, पोलीस आयुक्त राकेश ओला, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांसारख्या उच्चपदस्थ अधिकार्यांची देखील या कार्यक्रमाला शोभा वाढणार आहे. गझलनवाज भीमराव दादांनी आपल्या सादरीकरणातून उभ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. त्यांच्या गौरव सोहळ्यानंतर रसिकांसाठी भीमराव दादांच्या बहारदार गझल गायनाचा कार्यक्रम रंगणार आहे. हा संपूर्ण सोहळा विनामूल्य असून, अमरावतीकरांनी या स्वराभिषेकाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला नितेश राऊत यांच्यासह उपाध्यक्ष स्वप्निल उमप, सचिव सुरज दहाट, कोषाध्यक्ष अमोल देशमुख, सहसचिव अनिरुद्ध दवाळे आणि ज्येष्ठ पत्रकार यशपाल वरठे, संजय शेंडे, सुरेंद्र आकोडे, अमर घटारे, छगन जाधव, शुभम बायस्कर, अनिकेत दहातोंडे यांची उपस्थिती होती.




