मेडिकल कॉलेज बडनेर्‍यातच !

कोंडेश्वर जवळील अलियाबादची 11.29 हेक्टर जमीन कॉलेजसाठी मंजूर

* आ.रवि राणांच्या प्रयत्नांना यश, विरोधकांवर मात
* 100 विद्यार्थांना प्रवेश, 430 खाटांचे रुग्णालय
* मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून महसूलमंत्र्यांचा निर्णय

अमरावती/4 फेब्रुवारी – जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे, अमरावती जवळील आलियाबाद येथील 11.29 हेक्टर जमिनीचा अंतिम ताबा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सोपवण्यास महसूल विभागाने मंजुरी दिली. याबाबतचा निर्णय बुधवारी जारी करण्यात आला आहे.या जागेवर 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाईल. या महाविद्यालयाला संलग्न 430 रुग्णखाटांचे अद्ययावत रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. जमिनीचा ताबा मिळाल्यापासून तीन वर्षात नियोजित प्रकल्पाचे काम सुरू करणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे. जमीन ’भोगवटादार वर्ग-2’ या धारणाधिकाराने मूल्यरहित आणि कब्जेहक्काने प्रदान करण्यात आली आहे. जमिनीच्या वापराबाबत शासनाने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. महसूल विभागाच्या परवानगीशिवाय या जमिनीची विक्री, देणगी, गहाण किंवा कोणत्याही खाजगी-सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर हस्तांतरण करता येणार नाही.

आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळेल

या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम विदर्भातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. विद्यार्थ्याना मोठी संधी उपलब्ध होईल. जिल्ह्यातील नागरिकांची ही मागणी होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळू शकले. आरोग्यसेवा म्हणजे ईश्वरसेवा, हा सरकारचा ध्यास आहे. पालकमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो.
-चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, पालकमंत्री अमरावती

संबंधित बातम्या

Back to top button