अमरावती ड्रग्ज प्रकरणाचा महाविस्फोट
एमडी ड्रग्ज रॅकेटला पैसा पुरवणारे डीआरआयच्या रडारवर

* अकोला अन् बडनेरा परिसरात गुप्तचर विभागाचा तपासाचा विळखा
* चारही मुख्य तस्करांचा 16 फेब्रुवारीपर्यंत कारागृहात मुक्काम
* फोन आणि मेसेज तपासणीतून तस्करांची पूर्ण कुंडली यंत्रणेच्या हाती
अमरावती / 4 जानेवारी : शहराला हादरवून सोडणार्या पाच किलो अमली पदार्थ जप्ती प्रकरणानंतर आता या काळ्या धंद्याला रसद पुरवणारे मुख्य सूत्रधार महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) निशाण्यावर आले आहेत. तांत्रिक पुरावे गोळा करून या श्रीमंत गुंतवणूकदारांच्या मुसक्या आवळण्याची तयारी पूर्ण झाली असून, न्यायालयाने गुन्ह्यातील चारही मुख्य आरोपींना 16 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. अमरावती शहरातील नवसारी मार्गावरील एका उपहारगृहावर महसूल गुप्तचर संचालनालयाने धाड टाकून सुमारे पाच किलो अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असतानाच, आता या गुन्ह्याचे धागेदोरे शहरात पांढरपेशी समाजात वावरणार्या काही धनदांडग्या गुंतवणूकदारां पर्यंत पोहोचले आहेत. कमी वेळात गडगंज श्रीमंत होण्याच्या आमिषाने अमरावतीतील तीन ते चार बड्या व्यक्तींनी या तस्करीसाठी मोठी गुंतवणूक केल्याचे समोर येत आहे. सध्या तपास यंत्रणेने आपले लक्ष अमरावती, बडनेरा आणि अकोला या त्रिकोणी क्षेत्रावर केंद्रित केले असून, संशयितांच्या भ्रमणध्वनीवरील संभाषणांचे तपशील आणि संदेशांची अत्यंत बारकाईने पडताळणी सुरू आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असलेल्या या मोहिमेत गुन्हेगारांची पूर्ण कुंडली यंत्रणेच्या हाती लागली असून, ठोस पुरावे गोळा होताच कोणत्याही क्षणी मोठ्या अटकेची कारवाई केली जाऊ शकते. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले फैसल खान अंसार खान, अवैज अहमद आरीफ अहमद, मुश्तकिम खान अब्दुल ताहेर खान आणि शेख परवेज शेख नासीर या चौघांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित जोशी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपास यंत्रणेने सध्या अधिक पोलीस कोठडीची मागणी न केल्याने न्यायालयाने या चारीही आरोपींना 16 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बचाव पक्षाच्या वतीने अधिवक्ता मुर्तजा आझाद यांनी न्यायालयात बाजू मांडली. या प्रकरणातील आर्थिक नाड्या शोधण्यासाठी तपास पथक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशयितांचे संपर्क जाळे, इंटरनेटद्वारे केलेले संवाद आणि गुप्त बैठकांचा माग काढत आहे. अमरावतीसह लगतच्या शहरांमधील संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष असून, दोषींची सुटका होणे आता कठीण मानले जात आहे. या कारवाईमुळे अमरावतीच्या गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून, या तस्करीच्या मोठ्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आता बळावली आहे. तपास यंत्रणेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशयितांच्या इंटरनेट संवादाचे जाळे शोधून काढले आहे. अमरावतीसह लगतच्या शहरांमधील संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष असून, ठोस पुरावे हाती लागताच शहरातील बड्या धेंडांची रवानगी तुरुंगात होणार असून कुणाचीही सुटका होणे आता अशक्य मानले जात आहे. ज्या पांढरपेशी लोकांनी या काळ्या धंद्याला अर्थबळ दिले आहे, त्यांची नावे लवकरच उघड होतील, असा इशारा तपास यंत्रणेने दिला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे आंतरराज्यीय तस्करांचे धाबे दणाणले आहेत. अवैध धंदे तत्काळ बंद करा अन्यथा युवक काँग्रेस आंदोलन करणार अमरावती शहरात महसूल गुप्तचर आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत 10 कोटी रुपये किमतीचे 5 किलो ‘एमडी’ ड्रग्ज जप्त केले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून अमरावती ड्रग्ज तस्करीचे केंद्र बनत असल्याचा आरोप होत आहे. या गंभीर परिस्थितीवर युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत पोलीस आयुक्तांची भेट घेतली. जिल्हाध्यक्ष वैभव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली समीर जवंजाळ, सागर कलाने, आशिष यादव, आकाश धुरवाळकर, सौरभ तायडे, मोहित भेंडे, धनंजय बोबडे, गोविंद ठाकूर, शुभम बांबळ आणि शिवानंद भोंगाडे यांनी प्रशासकीय ढिसाळपणावर संताप व्यक्त केला. शाळा-महाविद्यालयीन तरुण माफियांच्या टप्प्यावर असून अवैध धंदे तत्काळ बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.




