नमो उद्यानाचे स्वप्न खुर्चीच्या वादात बेचिरास
चांदूर रेल्वेतील 1 कोटी रुपयांच्या ठरावाला भाजपाने आणली स्थगिती?

नगरसेवकांच्या आपसातील वादात; शहरवासीयांचे नुकसान
चांदूर रेल्वे/23 एप्रिल : स्वतःच्या सत्तेची मस्ती आणि अहंकाराचा फुगा फुगवण्यासाठी चांदूर रेल्वेच्या विकासाचा गळा आवळण्याचा नीच प्रकार येथील नगरसेवकांनी केला आहे. ज्या जनतेने विश्वासाने निवडून दिले, त्याच जनतेच्या तोंडाचा घास हिरावण्याचे पाप या लोकप्रतिनिधींनी केले असून, नमो उद्यानाच्या रूपाने शहराच्या पदरात पडणारे सुखाचे दान आता राजकारणाच्या गटारात फेकून दिले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील ’मी मोठा की तू मोठा’ या घाणेरड्या खेळामुळे चक्क जिल्हा प्रशासनाची स्थगिती आणून शहराच्या हक्काच्या 1 कोटी रुपयांच्या निधीची होळी करण्याचे कारस्थान रचले गेले आहे.
चांदूर रेल्वे नगरपालिकेने 25 मार्च आणि 2 एप्रिल रोजी नमो उद्यान उभारणीसाठी कंबर कसली होती. शहराच्या वैभवात भर टाकणारे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार इतक्यात, विकासकामात खोडा घालण्यासाठी टपलेल्या भाजप नगरसेवकांनी आपला रंग दाखवला. नगरपालिका अधिनियम 1965 मधील कलम 318 चा सोयीस्कर वापर करत 20 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाकडे या ठरावावर स्थगिती आणण्याची ’सुपारी’ दिली गेली. या स्थगितीमुळे केवळ उद्यानाचे काम थांबले नाही, तर शासनाकडून आलेला 1 कोटींचा भरघोस निधी मुदतीअभावी परत जाण्याची नामुष्की शहरावर ओढवली आहे. आपल्याच पोराबाळांच्या खेळण्याचे आणि वृद्धांच्या विरंगुळ्याचे साधन हिरावून घेताना या नगरसेवकांना थोडीही शरम वाटली नाही का, असा जळजळीत सवाल शहरवासीय विचारत आहेत. महाराष्ट्र शासनाने मोठ्या आशेने शहरासाठी आधुनिक सोयींचे उद्यान मंजूर केले होते, पण इथल्या राजकारण्यांच्या डोक्यात सत्तेची नशा इतकी चढली आहे की त्यांना शहराचे वाटोळे होताना दिसत नाहीये. वार्ताहर अभिजीत तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थगितीचे आदेश धडकल्याने पालिकेत सामसूम असली तरी सामान्य जनतेच्या मनात संतापाचा वणवा पेटला आहे. लोकप्रतिनिधी केवळ स्वतःचा ’मतलब’ आणि खुर्ची टिकवण्यात गुंग आहेत. विकासाच्या नावाने मते मागणारे हे नेते आज विकासाच्याच मुळावर उठले आहेत. जर हा 1 कोटीचा निधी परत गेला, तर चांदूर रेल्वेच्या प्रगतीला खीळ घालणार्या या एका-एका नेत्याला जनता येणार्या काळात गावच्या वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही. शहरवासीयांच्या स्वप्नांचा असा लचका तोडणार्या या प्रवृत्तीचा आता सर्वस्तरातून जाहीर धिक्कार होत आहे.




