पेच सुटला! खोडकेंचे ‘युतीधर्मा’चे वचन

आज महापौर-उपमहापौर निवडीचा ‘उपचार’ बाकी

उपमहापौर निवडीत राष्ट्रवादीची वेगळ्या भूमिकेची तयारी होती?

अमरावती / 5 फेब्रुवारी – अमरावती महानगर पालिकेच्या सत्ताकारणात आता मोठी उलथापालथ झाली असून आमदार संजय खोडके यांनी महायुतीच्या हितासाठी टोकाचा विरोध बाजूला सारत ‘युती धर्म’ पाळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांचा मार्ग मोकळा झाला असून महापालिकेतील राजकीय संभ्रम संपुष्टात आला आहे.
अमरावती महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विशेषतः आमदार रवी राणा आणि आमदार संजय खोडके यांच्यातील जुना राजकीय संघर्ष पाहता, खोडके गट युवा स्वाभिमानच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का? याबाबत मोठी साशंकता होती. निवडणुकीनंतर जेव्हा कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तेव्हा खोडके यांनी सुरुवातीला रवी राणा यांच्या पक्षासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर संजय खोडके यांनी शहराच्या विकासासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. महापौर पद भाजपकडे तर उपमहापौर पद युवा स्वाभिमानकडे देण्याचे आधीच ठरले होते. तरीही खोडके यांची भूमिका गुलदस्त्यात होती. आज दुपारी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय खोडके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या सदिच्छा भेटीनंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जाहीर केले की, महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही युती धर्माचे पालन करू आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे यांनाच मतदान करू. या निर्णयामुळे महापालिकेतील सत्तेचा पेच सुटला असून आता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा स्वाभिमान अशी त्रिपक्ष सत्ता स्थापन करणार हे निश्चित झाले आहे. या घडामोडींमुळे अमरावतीच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली असून सत्तेसाठी परंपरागत वाद विसरून नेते एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे.

बावनकुळेंची मध्यस्थी यशस्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोडके यांच्या घरी घेतलेली भेट या संपूर्ण नाट्याचा केंद्रबिंदू ठरली. या भेटीनंतरच खोडके यांनी आपला जुना विरोध मावळून युती धर्माला प्राधान्य दिले. यामुळे भाजपच्या रणनीतीला मोठे यश मिळाले असून सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे.

सचिन भेंडे यांची दावेदारी भक्कम खोडके यांच्या पाठिंब्यामुळे आता युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने ते आता उपमहापौर पदाची धुरा सांभाळतील. महायुतीच्या या ऐक्यामुळे विरोधकांचे मनसुबे उधळले गेले असून शहरात नव्या समीकरणाची चर्चा रंगली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button