शिक्षक संघटनांचा भोयर यांच्या उमेदवारीला पाठिंबा
जुनी पेन्शन योजनेसाठी लढ्याला बळकटी

अमरावती /30 सप्टेंबर– शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीत शिक्षक नेते चंद्रशेखर भोयर यांच्या उमेदवारीला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आणि शिक्षक महासंघाने पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या 12 ते 15 वर्षांपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात भोयर यांनी सक्रिय सहभाग घेतला असून राज्यभरातील 200 हून अधिक आंदोलनांत त्यांनी भूमिका बजावल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकार्यांनी केला. शिक्षकांचे वेतन, सेवासुरक्षा, पदोन्नती, रिक्त पदांची भरती आणि जुनी पेन्शन योजना या प्रश्नांना शासनस्तरावर ठामपणे मांडण्यासाठीच त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले.
अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी आणि विभागीय कार्यकारिणीच्या बैठकीत विविध निर्णयांची माहिती देण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर, रितेश खांडेकर, नदीम पटेल आणि मिलिंद गोलंके उपस्थित होते. पदाधिकार्यांनी सांगितले की, जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी भोयर सातत्याने शिक्षक आणि कर्मचार्यांसोबत उभे राहिले आहेत. या काळात त्यांनी राज्यभरातील आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. यावेळी भोयर यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला. शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकार्यांनी केले. भोयर यांच्या विजयासाठी व्यापक प्रचार मोहीम राबविण्याची माहितीही त्यांनी दिली. शिक्षकांच्या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठवून जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यासाठीचा लढा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.





