बांधकाम कामगारांच्या योजना तातडीने सुरू करा

10 हजार दिवाळी बोनससह विविध मागण्यांवर वेधले लक्ष

* जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

अमरावती /8 ऑक्टोबर- बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजनांपैकी 20 योजना फेब्रुवारी 2026 पासून बंद असल्याचा आरोप करीत पब्लिक सर्व्हिस कन्स्ट्रक्शन वर्कर्स युनियनच्या वतीने गुरुवारी अमरावतीत जोरदार मोर्चा काढण्यात आला. बंद केलेल्या सर्व योजना तातडीने सुरू कराव्यात, कामगारांना 10 हजार रुपयांचा दिवाळी बोनस द्यावा, तसेच प्रलंबित नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाच्या अर्जांचा तातडीने निपटारा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार तिखाडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. बहुजन कर्मचारी महासंघ भारताशी जोडलेले पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने बांधकाम कामगार मोर्चात सहभागी झाले. राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाजवळून सुरू झालेला मोर्चा प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील जुना बायपास मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. 13 जुलै रोजी जारी झालेल्या 4 शासन निर्णयांनंतर बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेल्या 32 योजनांपैकी 20 योजना बंद झाल्याचा संघटनेचा दावा आहे. शिक्षण, आरोग्य, विवाह, घरकुल, मातृत्व, निवृत्तीवेतन तसेच मृत्यू आणि दिव्यांग सहाय्याशी संबंधित योजनांचा त्यात समावेश आहे. फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया रखडल्याने हजारो कामगार शासकीय लाभांपासून वंचित असल्याचे संघटनेने म्हटले. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलमध्ये कामगारांना घरगुती वापराचे साहित्य, आवश्यक सुरक्षा संच, शिक्षण सहाय्य आणि आरोग्य सुविधा द्याव्यात. विवाह सहाय्यात महागाईनुसार वाढ करावी, अशीही मागणी करण्यात आली. घरकुल योजनेची प्रक्रिया सोपी करून मदत थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा करावी. नोंदणीतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. मोर्चानंतर जिल्हाधिकार्‍यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगारमंत्री आ. आकाश फुंडकर यांच्या नावाने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Back to top button