सौम्या शर्माची बदली, वर्षा लढ्ढा मनपा आयुक्त सत्यम गांधी जिल्हा परिषदेचे नवे सीईआ

अमरावती /2एप्रिल: राज्य शासनाने गुरुवारी महसूल आणि प्रशासकीय वर्तुळात मोठा फेरबदल घडवून आणला असून, अमरावती जिल्ह्याला दोन नवीन कार्यक्षम अधिकारी मिळाले आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा-चांडक या प्रसूती रजेवर गेल्याने त्यांच्या रिक्त जागी वर्षा लढ्ढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले सत्यम गांधी यांची वर्णी लागली आहे. या बदल्यां मुळे जिल्ह्याच्या प्रशास कीय कामाला आता नवी गती मिळणार असून, विकास कामांचा वेग वाढण्याची चिन्हे आहेत.
राज्य शासनाने गुरुवारी उशिरा 25 भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यामध्ये अमरावतीसह छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर आणि चंद्रपूर यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील खांदेपालट करण्यात आला आहे. अमरावती महानगर पालिकेच्या नवनियुक्त आयुक्त वर्षा लढ्ढा यापूर्वी पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेत कार्यरत होत्या. दुसरीकडे, अमरावती जिल्हा परिषदेची धुरा आता 2020 च्या तुकडीचे अधिकारी सत्यम गांधी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गांधी हे यापूर्वी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे, अमरावतीच्या मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांची बदली आता सांगलीच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. अशा प्रकारे गांधी आणि महापात्र यांच्यामध्ये पदांची अदलाबदल झाली आहे.
या मोठ्या फेरबदलात छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांची नवी मुंबईतील जलजीवन मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, तर तेथील जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी रवानगी करण्यात आली आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची मुंबईत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सह-मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. दीपक सिंगला यांची नागपूर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे. कोल्हापूरच्या महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणात अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी डॉ. राजेंद्र भारूड यांची वर्णी लागली आहे. पुण्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे आता बुलढाण्याचे नवे जिल्हाधिकारी असतील, तर नागपूरचे रोजगार हमी योजना आयुक्त डॉ. भारत बस्तेवाड यांची लातूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिका आयुक्त म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी डॉ. विजय राठोड कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी असतील. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा आता छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी असतील, तर बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची पुणे येथे पशुसंवर्धन आयुक्त म्हणून बदली झाली आहे. मुंबईतील डॉ. मंगेश गोंदवले यांची गोंदियाच्या जिल्हाधिकारीपदी, तर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूरच्या अतिरिक्त आयुक्त वसुमाना पंत आता चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी असतील. गोंदियाचे जिल्हाधिकारी प्राजित नायर यांची पुण्यात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून बदली झाली असून, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आता सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार सांभाळतील. जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत बदली झाली असून, त्यांच्या जागी कृष्णकांत कनवारिया जालना जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. रत्नागिरीच्या राजापूर येथील उपविभागीय अधिकारी जास्मिन यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बढती झाली आहे, तर अंजली शर्मा यांची जालना महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व बदल्यांमुळे संपूर्ण राज्याच्या प्रशासकीय नकाशावर नवीन चेहेरे पाहायला मिळणार असून, अमरावतीला मिळालेल्या दोन नव्या तरुण अधिकार्‍यांकडून जिल्ह्याच्या विकासाच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

प्रशासकीय खांदेपालट; संजिता महापात्र सांगलीला
अमरावती जिल्हा परिषदेत उल्लेखनीय काम करणार्‍या संजिता महापात्र यांची आता सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी येणारे सत्यम गांधी हे आपल्या शिस्तबद्ध कार्यशैलीसाठी ओळखले जातात, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कारभारात आता ’कडक’ शिस्त येण्याची चर्चा गावखेड्यात रंगली आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा-चांडक या प्रसूती रजेवर जात असल्याने त्यांच्या रिक्त जागी वर्षा लढ्ढा यांची वर्णी लागली आहे

 

संबंधित बातम्या

Back to top button