सोमेश्वर पुसतकर सांस्कृतिक महोत्सवाची जल्लोषात सुरुवात

अनिरुद्ध जोशी, मधुरा कुंभार, मंगेश बोरगावकर व राधिका भिडे यांची मैफिल

अमरावती/28 एप्रिल- अमरावतीकरांसाठी एक संगीतमय पर्वणी घेऊन ’सोमेश्वर पुसतकर सांस्कृतिक महोत्सव’ सज्ज झाला असून गुरुवारी 30 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात ’हो सुरानो चंद्र व्हा’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ, आम्ही सारे फाउंडेशन आणि सोमेश्वर पुसतकर मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. महोत्सवाला अमरावतीकरांचा दरवर्षी उदंड प्रतिसाद मिळतो. मागील वर्षीच्या कार्यक्रमाला मिळालेली विक्रमी गर्दी पाहून यंदाही प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.यंदाच्या सांस्कृतिक मेजवानीत महाराष्ट्रातील चार दिग्गज कलाकार एकाच मंचावर आपली कला सादर करणार आहेत. यामध्ये ’सा रे ग म प’ आणि ’सूर नवा ध्यास नवा’ फेम अनिरुद्ध जोशी, प्रभावी गायिकेच्या नावलौकिकात असलेल्या आणि ’स्त्री शक्ती सन्मान’ पुरस्कार विजेत्या मधुरा कुंभार, ’सा रे ग म प’चे उपविजेते लोकप्रिय पार्श्वगायक मंगेश बोरगावकर, तसेच स्वतः गाणी लिहिणार्‍या व संगीतबद्ध करणार्‍या ’आय-पॉपस्टार’ राधिका फडे हे कलाकार आपली मोहिनी घालणार आहेत. अनिरुद्ध जोशी यांच्या दमदार आवाजाने आणि मधुरा कुंभार यांच्या भावपूर्ण गायकीने वातावरण बहरणार आहे. मंगेश बोरगावकर यांच्या गाण्यांनी तर राधिका फडे यांच्या सुरेल रचनांनी हा कार्यक्रम स्मरणीय ठरेल. आपल्या सुरावटींच्या जोरावर हे कलाकार अमरावतीचे वातावरण संगीतमय करतील. निखळ मनोरंजनाची पर्वणी असलेल्या या कार्यक्रमासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button