सिपना शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात
घोडेस्वार आणि सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला परीसर

अमरावती/19 फेब्रुवारी – येथील सिपना अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ’सिपना शिव महोत्सव 2026’ अंतर्गत निघालेल्या भव्य शिवजयंती मिरवणुकीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. सायन्स कोर मैदानावरून सकाळी 10 वाजता निघालेल्या या शिस्तबद्ध रॅलीमध्ये ’जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने आसमंत दणाणून गेला होता. भगवे फेटे, हाती घेतलेले भगवे ध्वज आणि ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत केवळ महाविद्यालयाचे विद्यार्थीच नव्हे, तर शाळेतील लहान मुलेही मावळ्यांच्या वेशभूषेत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. शहरातील मुख्य चौकांमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याने आणि साहसी खेळांनी नागरिकांना मंत्रमुग्ध केले. संस्थेचे अध्यक्ष जगदीश गुप्ता, उपाध्यक्ष अजयभाई श्रॉफ, प्राचार्य डॉ. संजय खेरडे यांच्या मार्गदर्शनात निघालेल्या या सोहळ्यात विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. प्रवीण मळसणे, प्रा. अमित शाह, हर्ष रामटेके, स्नेहा वासकर, अरुणा लावणकर यांच्यासह सर्व शिक्षक आणि कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते. मिरवणुकीत बुलेट स्वार युवती, घोड्यावर स्वार झालेले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे रूप पाहून नागरिक भारावून गेले. ही रॅली शिवटेकडी, गर्ल्स हायस्कूल, गणेशदास राठी चौक, इर्विन, जयस्तंभ, राजकमल आणि राजापेठ मार्गे सिपना महाविद्यालयात पोहोचली, जिथे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सांगता झाली. मिरवणुकीच्या यशस्वितेसाठी यथार्थ निहाटकर, प्राजक्ता मुंडे, मनस्वी देशमुख, भावेश रायको, गायत्री जाधव, राजनंदिनी आणि तन्वी देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. सजीव देखावे आणि मावळ्यांचा उत्साह-मिरवणुकीत मेहरदीप पारखे याने शिवाजी महाराज, ईशा डंबाळे हिने जिजामाता तर उन्नती चौधरी हिने सईबाईंची भूमिका हुबेहूब साकारली होती. ढोल ताशांच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या सावलीत तरुणाईचा जल्लोष विदर्भाच्या मातीतील शिवप्रेम अधोरेखित करणारा ठरला.




