शुभम ठाकरेच्या हल्लेखोर गजाआड
शिशा बारमधील घटनेचा पर्दाफाश, क्षुल्लक वादातून भररस्त्यात केली होती मारहाण

अमरावती /26 फेब्रुवारी : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दस्तुर नगर मार्गावरील ’शिशा बार’मध्ये दारूच्या नशेत झालेल्या एका किरकोळ वादाने इतके रौद्र रूप धारण केले की, भररस्त्यात एका 30 वर्षीय तरुणाचा धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. शुभम किशोर ठाकरे (रा. गोपाल नगर) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या रक्ताने संपूर्ण परिसर हादरून गेला. या थरारानंतर पसार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी गुन्हे शाखेने ’फिल्डिंग’ लावली आणि अवघ्या सहा तासांच्या आत आरोपी अनुप दीपकराव पांडे (41, रा. दापोरी खुर्द, ता. तिवसा) याला स्वास्तिक नगरमधील एका गुप्त ठिकाणाहून बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची थरारक हकीकत अशी की, 25 फेब्रुवारी रोजी रात्री शुभम ठाकरे हा आपला मित्र गणेश पुसदकर याच्यासोबत शिशा बारमध्ये बसला होता. त्याच वेळी आरोपी अनुप पांडे तिथे पोहोचला. दोघेही नशेच्या धुंदीत असताना रात्री साडे अकराच्या सुमारास काळाने झडप घातली. शुभमच्या टेबलावर असलेला दारूचा ग्लास अनुपने रागाच्या भरात फेकून दिला आणि वादाची ठिणगी पडली. शब्दाने शब्द वाढत गेला आणि दोघांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी सुरू झाली. बारच्या काउंटरपर्यंत एकमेकांना ढकलत नेल्यानंतर शुभम बाहेर पडला. मात्र, डोक्यात खुनशी विचार घेऊन बसलेल्या अनुपने दबा धरून शुभमवर चाकूने एकामागून एक सपासप वार केले. त्यावेळी शुभम जमिनीवर कोसळला आणि आरोपी आपल्या दुचाकीवरून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. त्याचा मित्र गणेश पुसदकर हा शुभमला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी जात असतांना शुभमची प्राणज्योत मालवली आणि एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला गेला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे वेगाने हलवली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज आणि गुप्त बातमीदारांचे जाळे विणून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. स्वास्तिक नगरमधील एका भाड्याच्या खोलीत लपलेल्या अनुप पांडेला गुन्हे शाखेच्या चपळ पथकाने फिल्मी स्टाईलने झडप घालून ताब्यात घेतले. या कारवाईत गुन्हे शाखेच्या सर्वच अधिकारी आणि कर्मचार्यांनी रात्रभर जागून तपासाची चक्रे फिरवली, ज्यामुळे अवघ्या सहा तासांत आरोपी जेरबंद झाला.




