पेट्रोल पंपावर राडा, रुग्णवाहिकेलाही अडवले

नायरा पंपावर इंधन वितरण बंद केल्याने संताप

* मुजोर चालकावर कठोर कारवाईची मागणी

नांदगाव पेठ /27 मार्च  – राष्ट्रीय महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपावर अचानक इंधन वितरण बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. प्रचंड गर्दी झाल्याचे कारण पुढे करत पंप चालकाने वितरण थांबवल्याने वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या संपूर्ण प्रकारात सर्वात गंभीर बाब म्हणजे, एका गंभीर रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका इंधन भरण्यासाठी आली असता, तिला प्राधान्य न देता बराच वेळ ताटकळत ठेवण्यात आले. रुग्णवाहिकेत रुग्ण असूनही इंधन देण्यास नकार दिल्याने उपस्थित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असल्याची प्रतिक्रिया सर्व सामान्यांमधून उमटली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ग्राहकांशी वाद घालून संतापलेल्या चालकाने इंधन देणे पूर्णपणे बंद केले. काही सुज्ञ नागरिकांनी कर्मचारी वाढवून वितरण सुरू करण्याचा सल्ला दिला असता, तुम्हाला जे करायचे ते करा, मला काही फरक पडत नाही, अशी मुजोर भूमिका चालकाने घेतली. संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे भ्रमणध्वनी बंद असल्याने परिस्थिती अधिक चिघळली. सुमारे एका तासानंतर इंधन पुरवठा सुरू झाला, मात्र या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

संबंधित बातम्या

Back to top button