जनगणना, मतदार यादी पडताळणी कार्यक्रम आणि दीर्घ सुट्टी लक्षात घेऊन शिक्षक प्रशिक्षण पुढे घ्या
प्राथमिक शिक्षक समितीची संचालक, सहसंचालक पुणे यांच्याकडे मागणी

अमरावती /20एप्रिल: इयत्ता 2 री, 3 री, 4 थी नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षकांसाठी प्रशिक्षण जिल्हास्तर- 11 ते 14 मे 2026 आणि तालुकास्तर- दि. 18 मे ते 30 मे 2026 आयोजित करण्यात येत आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षक प्रशिक्षण आवश्यक आहे यात दुमत नाही.मात्र सदर प्रशिक्षण कालावधी संबंधाने काही बाबी लक्षात घेऊन प्रशिक्षण सत्र सद्यस्थितीत पुढे ढकलणे गरजेचे आहे.अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषद पुणेचे संचालक डॉ.हेंमतकुमार वसेकर,सहसंचालक डॉ.कमलादेवी आवटे यांना निवेदनाव्दारे केली आहे.असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
या मध्ये जनगणना – भारताची दशवार्षिक जनगणना सुरु होत असून प्रगणक, पर्यवेक्षक म्हणून राज्यातील जवळपास सर्वच प्राथमिक शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. प्रत्यक्ष जनगणनेचा पहिला टप्पा दि. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत आहे. तसेच मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहात जनगणनेबाबत प्रशिक्षण आहे. त्यामुळे जनगणनेसाठी सेवा अधिग्रहित केलेल्या शिक्षकांचे नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण नियोजित कालावधीत घेणे शक्यच नाही. मतदार पडताळणी कार्यक्रम: मा. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सध्या मतदार पडताळणी कार्यक्रम राज्यात सर्वत्र सुरु आहे. या अशैक्षणिक कामासाठी प्राथमिक शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे म्हणून नियुक्त शिक्षक नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण घेऊ शकणार नाहीत. दीर्घ सुट्टीत कोणतेही प्रशिक्षण न घेणे: प्राथमिक शिक्षक दिवाळी आणि उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी उपभोगणारे कर्मचारी असल्याने प्राथमिक शिक्षकांना अन्य कर्मचार्यांप्रमाणे 30 दिवसाच्या अर्जित रजा अनुज्ञेय नाहीत. दीर्घ सुट्टी लागू असल्याने प्राथमिक शिक्षकांना रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही. त्याचप्रमाणे उन्हाळी सुट्टी कालावधीचा वाहतूक भत्ता सुद्धा दिल्या जात नाही.राज्यातील प्राथमिक शिक्षक दीर्घ सुट्टी उपभोगतात हा केवळ भास आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांत शिक्षकांशिवाय अन्य कोणताही शिक्षकेत्तर कर्मचारी नसल्याने उन्हाळी सुट्टी कालावधीत (टपाल, पाठ्यपुस्तके प्राप्त करणे, योजनांविषयक कामे, विद्यार्थी प्रविष्ठ करणे, दाखले देणे इत्यादी..) आणि कार्यालयीन सर्व कामकाज शिक्षकांनाच करावे लागते.शिक्षक दीर्घ सुट्टी उपभोगतात म्हणून जर शिक्षकेत्तर कर्मचार्यांप्रमाणे अनेक बाबी शिक्षकांना लागू नाहीत; तर दीर्घ सुट्टी कालावधीत कोणतेही प्रशिक्षण घेण्यास शिक्षकांना बाध्य करणे अनाकलनीय असून तर्कसंगत तर्कसंगत नाही अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून ठाम धारणा आहे. प्राथमिक शिक्षकांना केवळ सुट्टया पाहिजेत असा कोणताही सोयीचा अर्थ कुणाकडूनही न काढता शिक्षकांना असलेल्या तथाकथित दीर्घ सुट्टया बंद करून शिक्षकेत्तर कर्मचारी आणि अधिकार्यांप्रमाणे प्रत्येक शनिवार सह त्याप्रकारचे सर्व नियम व सुविधा लागू कराव्यात आणि कामकाजाच्या दिवसांमध्ये प्रशिक्षणे, कार्यशाळा शासन /प्रशासनाने घ्याव्यात.जनगणना, इङज म्हणून सुरु असलेले अनिवार्य कार्य आणि तथाकथित दीर्घ सुट्टी लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण तूर्तास स्थगित करून नवीन शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर शिक्षक प्रशिक्षण घेण्यात यावे अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कडून मागणी करण्यात आली आहे.




