आता परीक्षेच्या दिवशीच होणार पटसंख्येची पडताळणी
दुसरी ते अकरावीची होणार तपासणी

अमरावती/5 एप्रिल: राज्यातील शाळांमध्ये असणारी विद्यार्थ्यांची फुगवलेली संख्या आणि बोगस पटसंख्येला चाप लावण्यासाठी राज्य शिक्षण विभागाने कंबर कसली असून, आता थेट परीक्षेच्या दिवशीच विद्यार्थ्यांची मोजणी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षण संचालक शरद गोसावी आणि डॉ. महेश पालकर यांनी यासंदर्भात कडक आदेश काढले असून, आगामी 11, 15 आणि 22 एप्रिल रोजी राज्यातील शाळांमध्ये ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. यामुळे दांडीबहाद्दर शाळांचे धाबे दणाणले असून, प्रत्यक्ष वर्गात असणार्या मुलांचीच आता शासन दरबारी नोंद होणार आहे.
राज्यातील शैक्षणिक कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे, इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा सुरू असल्याने त्यांची वेगळी पडताळणी केली जाणार नाही, मात्र इयत्ता 2 री ते 9 वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी आणि 11 वीच्या वार्षिक परीक्षेच्या दिवशीच हे पथक शाळेत धडक देणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठी, इंग्रजी आणि भौतिकशास्त्र अशा महत्त्वाच्या विषयांच्या पेपरच्या दिवशी तपासणी पथके उपस्थित राहून हजेरी पटाची खातरजमा करतील. या मोहिमेसाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता आणि वेतन पथकाच्या अधीक्षकांसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शाळांना भेटी देणार्या या पथकाला विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी संकेतस्थळावर खास सुविधा दिली जाणार असून, त्याचे प्रशिक्षण 7 एप्रिलपर्यंत पूर्ण केले जाईल. शिक्षणाधिकार्यांनी आपापल्या जिल्ह्यात या कामाचे सूक्ष्म नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. गावोगावी असणार्या शाळांमध्ये आता केवळ कागदावर दिसणारे विद्यार्थी चालणार नाहीत, तर वर्गात हजर असणार्या मुलांच्या डोक्यावरच यापुढे सरकारी सवलतींचे गणित अवलंबून असेल.
पथकाची करडी नजर
राज्यातील शाळांमध्ये बोगसगिरी रोखण्यासाठी शिक्षण विभागाने 7 एप्रिलपूर्वी सविस्तर आराखडा तयार केला आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाच्या संगणकीय प्रणालीवर हजर-गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद पथकामार्फत तातडीने केली जाणार असून, यात कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नाही.




