शिशा बारसमोर तरुणाचा खून

छातीवर सपासप वार करून शुभम ठाकरेचा काढला काटा

* लग्नाच्या शेरवानीत आला अन् काळ बनून शुभमवर तुटून पडला

अमरावती / 25 फेब्रुवारी : शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या गोपाल नगर परिसरात बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास रक्ताचा थरार घडला. चिंतामणी लॉनच्या पाठीमागे असलेल्या शिशा बारसमोर शुभम किशोर ठाकरे या 29 वर्षीय तरुणाचा भररस्त्यात काळजावर धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. मद्यपानानंतर झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले आणि एका अज्ञात मारेकर्‍याने शुभमचा गेम केला. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, भरवस्तीत झालेल्या या खुनामुळे अमरावतीकर हादरले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मराठा विहार कॉलनीतील रहिवासी असलेला शुभम ठाकरे आणि त्याचा मित्र गणेश पुसदकर हे दोघे बुधवारी रात्री शिशा बारमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी बसले होते. तेथे एका टेबलावर गप्पा सुरू असतानाच, लग्नाच्या पोशाखात (शेरवानी) असलेल्या एका अज्ञात तरुणाने दोनदा त्यांच्या टेबलावर येऊन विनाकारण खोडी काढली आणि वादाला तोंड फोडले. मद्यपान आटोपून शुभम आणि गणेश बारच्या बाहेर पडले, मात्र तो ’शेरवानी’वाला इसम तिथेच दबा धरून बसला होता. बाहेर येताच पुन्हा वाद झाला आणि संतापलेल्या त्या अज्ञात हल्लेखोराने चावीसारख्या टोकदार शस्त्राने शुभमच्या छातीवर एकामागून एक तीन गंभीर वार केले.
रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या शुभमला मित्र गणेशने तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. शुभमच्या मृत्यूची बातमी वार्‍यासारखी पसरताच त्याच्या मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली आहेत. मारेकरी हा लग्नसमारंभातून आला असावा आणि तो याच परिसरातील रहिवासी असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या थरारक हत्याकांडाने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस आता त्या ’शेरवानी’वाल्या मारेकर्‍याचा कसून शोध घेत आहेत.
’शेरवानी’वाल्या मारेकर्‍याचा पोलिसांकडून शोध-शुभमची हत्या करणारा आरोपी हा लग्नाच्या पोशाखात म्हणजेच शेरवानीमध्ये होता, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्याचा मित्र गणेश पुसदकर याने पोलिसांना दिली आहे. तो आरोपी गोपाल नगर परिसरातीलच असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज आता तपासले जात आहे. एका किरकोळ वादातून तरुणाचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button