मुंबईत बच्चू कडूंची राजकीय भूमिकेबद्दल स्पष्टोक्ती
दिव्यांग आणि शेतकर्यांच्या प्रश्नांवर लढणार

विलीनीकरणाची चर्चा फेटाळून मैदानात
अमरावती/29 एप्रिल- प्रहार जनशक्ति पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली असून, सत्तेसाठी कधीही तत्त्वांशी तडजोड करणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विधान परिषदेत संधी मिळाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिपाई म्हणून काम करण्याची तयारी दर्शवतानाच, शेतकर्यांच्या आणि दिव्यांगांच्या हितासाठी आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणार असल्याचे त्यांनी ठणकावूनसांगितले. प्रहार पक्षाचे अस्तित्व कुणाही समोर झुकणार नाही आणि जनहिताच्या मुद्द्यांवर कोणत्याही परिस्थितीत समझोता केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांनी आपल्या बॅगेत उमेदवारी अर्ज असल्याचे सांगत राजकीय हालचालींचे संकेत दिले. प्रहार पक्ष हा एक लाखांहून अधिक कार्यकर्त्यांचे पाठबळ असलेला संघटन असून, त्याचे अस्तित्व कोणत्याही मोठ्या पक्षात विलीन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ सत्तेच्या अभिलाषेपोटी पक्ष विलीन करण्याच्या वावड्या उठवल्या गेल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आ. उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली असली, तरी अद्याप कोणत्याही ठोस निर्णयावर शिक्कामोर्तब झालेले नाही. शेतकर्यांना न्याय आणि कष्टकर्यांच्या पदरात हक्क पाडणे हीच आपली प्राथमिकता असल्याचे सांगत त्यांनी आगामी काळात जनहिताच्या अटींवरच महायुतीसोबत राहण्याचे संकेत दिले आहेत.
गत विधानसभा निवडणुकीत प्रहार पक्षाने 38 जागांवर नशीब आजमावले होते, मात्र मतदारांनी दिलेल्या कौलाचा आदर करत त्यांनी आपल्या पराभवाची प्रांजळ कबुली दिली. भाजपसोबत जाण्याचा निर्णय आपल्या पारंपरिक मतदारांना रुचला नसल्याचे त्यांनी मान्य केले, मात्र प्रहारची ताकद आजही गावागावात कायम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विधान परिषदेच्या रिंगणात उतरण्यासाठी आवश्यक असलेले 28 मतांचे गणित आणि महायुतीचे संख्याबळ पाहता, प्रहार पक्षाला सन्मानजनक वागणूक मिळाल्यास पुढील प्रवास सोपा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 12 मे रोजी होणार्या या निवडणुकीसाठी राजकीय डावपेच आखले जात असताना, बच्चू कडू यांनी आपल्या अटी आणि शर्तींवर ठाम राहून स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे.
भाजपाने या निवडणुकीसाठी सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांची नावे निश्चित केली असून, रिक्त जागेसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव जाहीर केले आहे. सद्याच्या विधानसभा संख्याबळानुसार भाजपाचे सहा, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. अशा स्थितीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या बच्चू कडू यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी 2 मे रोजी होणार असून 4 मे पर्यंत नाव मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर 12 मे रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार असून त्याच दिवशी संध्याकाळी निकालाचे चित्र स्पष्ट होईल. अचलपूरचे सलग चार वेळा प्रतिनिधित्व करणार्या या नेत्याने आता विधान परिषदेच्या माध्यमातून नवी राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे.
बच्चू कडू सत्तेशिवाय राहू शकत नाहीत
अचलपूरचे आ. प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्यावर कडाडून प्रहार केला असून कडू सत्तेविना क्षणभरही राहू शकत नसल्याचे म्हटले आहे. गेल्या वीस वर्षांपासून सत्तेत राहण्याची सवय झालेल्या कडूंची अवस्था पाण्याविना तडफडणार्या मासोळीसारखी झाली आहे. स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि केवळ वैयक्तिक फायद्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊन तडजोडी करतात. सत्तेसाठी कुणाच्याही पाया पडायला ते मागे-पुढे पाहत नाहीत. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत वादाशी आमचा संबंध नसून सत्तेचा कोणताही अंतिम निर्णय केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असे आ. तायडे यांनी दैनिक आपली मातृभूमीशी बोलताना स्पष्ट केले.
– आ. प्रवीण तायडे, भाजपा अचलपूर
सर्व आरोप खोटे असून जनता उत्तर देईल
आमच्यावर होत असलेले सर्व आरोप पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असून विरोधक केवळ प्रसिद्धीसाठी अशी खालच्या पातळीवरची टीका करत आहेत. सत्तेसाठी कधीही लाचारी पत्करली नाही आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे हेच आमचे मुख्य ध्येय राहिले आहे. 20 वर्षांपासून जनतेने दिलेले प्रेम आणि विश्वास हीच आमची खरी ताकद असून कुणी कितीही टीका केली तरी आम्ही डगमगणार नाही. सत्तेपेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची असून योग्य वेळी या सर्व आरोपांना सडेतोड उत्तर दिले जाईल आणि जनताच याचा निकाल लावेल अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
– माजी आ. बच्चू कडू,
अध्यक्ष प्रहार संघटन




