मेळघाटात मेडिकल कॉलेजसाठी हालचाली सुरु

कुपोषण आणि माता मृत्यूला बसणार लगाम, पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर प्रशासन लागले कामाला

अमरावती / 9 फेब्रुवारी – मेळघाटातील कुपोषण आणि माता मृत्यूचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आता धारणी किंवा चिखलदरा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रशासनाने या कामाला गती दिली असून, भाजप नेते सुखदेव पवार यांच्या मागणीला मोठे यश मिळताना दिसत आहे. या प्रकल्पामुळे मेळघाटातील दुर्गम भागात राहणार्‍या आदिवासी बांधवांच्या आरोग्याचा वनवास संपणार असून, त्यांना आता वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळणे शक्य होईल.
मेळघाट हा अतिशय डोंगराळ आणि कठीण भाग असल्याने येथील रुग्णांना उपचारासाठी 150 ते 200 किलोमीटर लांब अमरावती किंवा नागपूरला धाव घ्यावी लागते. अनेकदा प्रवासातच रुग्णांचा मृत्यू होतो. ही विदारक स्थिती बदलण्यासाठी सुखदेव पवार यांनी 23 मार्च रोजी सरकारकडे हक्काच्या वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी केली होती. यावर 4 फेब्रुवारी रोजी जिल्हा शल्य चिकित्सक, सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार आणि भूमी अभिलेख उपअधीक्षक यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. महाविद्यालयासाठी लागणारी जागा आणि तांत्रिक बाबींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. येथे तज्ज्ञ डॉक्टर आणि आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यास कुपोषणाचे सावट दूर होईल .

संबंधित बातम्या

Back to top button