कर्जमाफीसाठी आता मोदींनीच ‘देवाभाऊंना’ द्यावे आदेश

खा. बळवंत वानखडे

अमरावती / 30 जुलै : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा भडका उडत असताना, अमरावतीचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी आज लोकसभेत यासंदर्भात मुद्दा उपस्थित करत भाजपसह महायुती सरकारला धारेवर धरले. “कर्जाच्या बोझाखाली पिचलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्याऐवजी सरकार डोळे झाकून बसले आहे. कर्जमाफीचं आश्वासन फसवाच ठरतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता स्वतः हस्तक्षेप करून ‘देवाभाऊंना’ आदेश द्यावेत,” असा खरमरीत टोला वानखडे यांनी लगावला.
शेतकर्‍यांच्या व्यथा मांडताना वानखडे म्हणाले, “पिकांची सातत्याने होणारी हानी, बाजारभावात अस्थिरता आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकर्‍यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही. अशा परिस्थितीत कर्जमाफी हेच एकमेव उत्तर आहे. पण महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर वर्ष उलटून गेलं तरी फक्त चर्चा चालू आहेत, निर्णय काही होत नाही.”
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने दिलेली ग्वाही आठवण करून देत वानखडे म्हणाले, “जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं. पण सरकार सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफीचं आश्वासन फसवं ठरतंय. आणि हो, महाराष्ट्रात तर मोदींच्या म्हणण्याशिवाय पानही हालत नाही. देवेंद्र फडणवीस म्हणजेच ‘देवाभाऊ’ फक्त त्यांच्या आदेशावरच पावलं उचलतात. म्हणूनच शेतकर्‍यांना वाचवायचं असेल तर मोदींनीच त्यांना स्पष्ट आदेश द्यावा!”, असे बळवंत वानखडे म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button