इर्विनला डॉ. आंबेडकरांचे नाव कधी देणार ? अमरावतीकरांचा सवाल

नामांतराचा प्रस्ताव मंत्रालयात धूळखात

महामानवाच्या नावाचा फलकही प्रशासनाने हटवला

प्रशासकीय उदासीनतेमुळे जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रश्न प्रलंबित

अमरावती/10 एप्रिल– अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय ‘इर्विन’च्या नामांतराचा मुद्दा शासन दरबारी अडकला असून, तीन वर्षांपूर्वी पाठवलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा प्रस्ताव नेमका कुठे गायब झाला, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. 78 वर्षांचे स्वातंत्र्य लाभूनही ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड इर्विन यांच्या नावाचा गुलामगिरीचा शिक्का पुसला जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी होत असताना हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
14 एप्रिल 2023 रोजी युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक आ. रवी राणा आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नामांतराचा फलक लावून मोठा जल्लोष केला होता. मात्र, प्रशासनाने नवीन प्रवेशद्वार बांधताना हा फलक काढून टाकला, तो पुन्हा कधीच दिसला नाही. जिल्हा शल्य चिकित्सकांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवूनही त्यावर कोणतीही अधिकृत मोहोर उमटलेली नाही. केवळ इर्विनच नव्हे, तर डफरिन स्त्री रुग्णालयालाही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव धूळखात पडला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोन्ही स्तरावर या महत्त्वाच्या विषयाचा विसर पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

नामांतराचा लढा आणि प्रशासकीय दिरंगाई

इर्विन रुग्णालयाचे नाव बदलण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. आ. रवी राणा आणि तत्कालीन खा. नवनीत राणा यांनी फलक लावूनही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली नाही. जुना फलक सहा महिने टिकला, मात्र बांधकाम दुरुस्तीच्या नावाखाली तो हटवून महामानवाचा अवमान केल्याची भावना जनमानसात उमटत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button