युवकांच्या सर्वांगीण विकासाचा उपक्रम ‘करिअर कट्टा’ कार्यशाळा उत्साहात
कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, डॉ. राजीव बोरकरसह मान्यवरांची उपस्थिती

अमरावती/24एप्रिल: अमरावतीमध्ये महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या वतीने ’करिअर कट्टा’ या विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रमात कौशल्य विकास, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन शिक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या सहकार्याने आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, डॉ. धनंजय तोंडेकर, विभागीय समन्वयक डॉ. दिनेश खेडकर आणि डॉ. रंजना जीवने उपस्थित होते. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी स्पर्धेच्या युगात केवळ पदवी न मिळवता कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोले यांनी ’करिअर कट्टा’ या उपक्रमाचा पाच वर्षांचा प्रवास आणि यशाची गाथा उपस्थितांसमोर मांडली. कार्यशाळेत डॉ. दिनेश खेडकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि नॅकच्या निकषांची सविस्तर माहिती दिली. डॉ. उमेश कोनेकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सामंजस्य करार या विषयावर तांत्रिक मार्गदर्शन केले, तर प्रा. ममता पिंपजळ यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध क्लबच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचा समारोप करताना प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभागी होऊन भविष्यातील संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन डॉ. रेखा मगर यांनी केले तर डॉ. रंजना जीवने यांनी आभार मानले. या कार्यशाळेत 125 हून अधिक महाविद्यालयांचे प्राचार्य व समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




