तीन वर्षांपासून शहरात अवैध एमडी ड्रग्जचा व्यवसाय
ड्रग्ज तस्करीवर पोलिसांचा ‘ऑपरेशन वाईप आऊट’

यावर्षी तीन महिन्यात, 13 कारवाया, 55 आरोपी नामनिर्देशित
3 कोटी 98 लाखांचा मुद्देमाल जप्त
शहरातील 5 मोठ्या तस्करांचा शोध सुरू
अमरावती /13 एप्रिल: शहरात गेल्या तीन वर्षांपासून अवैध ड्रग्ज तस्करी आणि विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ’ऑपरेशन वाईप आऊट’ अंतर्गत आतापर्यंत एमडी आणि गांजा तस्करीचे एकूण 13 गुन्हे उघडकीस आले असून, यामध्ये 55 जणांना आरोपी करण्यात आले आहे. या आरोपींकडून एकूण 3 कोटी 98 लाख 17 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व 13 कारवाया 1 जानेवारी ते 10 एप्रिल 2026 या कालावधीत करण्यात आल्या आहेत. शहरातील या अवैध व्यवसायावर लगाम घालण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या निर्देशानुसार आता ’ऑपरेशन वाईप आऊट’ अधिक तीव्र करण्यात येणार आहे. शहरात एमडी ड्रग्ज आणण्यासाठी अर्थपुरवठा करणारे फायनान्सर आणि मुख्य तस्कर सध्या फरार असून, क्राईम ब्रँचचे पथक त्यांचा कसून शोध घेत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हैदराबाद येथील डीआरआय (ऊठख) पथकाने अमरावतीच्या नवसारी परिसरातील एका ढाब्यावर छापा टाकून 4 किलो 900 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले होते. या पथकात नागपूरचे अधिकारी व कर्मचारीही सहभागी होते. या कारवाईत अमरावती येथील 4 तस्करांना अटक करण्यात आली होती, जे सध्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. या कारवाईनंतरच अमरावतीत मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्जची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यापूर्वी शहर पोलिसांनी छोट्या कारवाया केल्या होत्या, मात्र डीआरआयच्या कारवाईने पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशाने विविध ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात झाली. दुसरी मोठी कारवाई मार्च महिन्यात क्राईम ब्रँचचे निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकाने सुकळी-बनारसी रोडवर सापळा रचून मुंबईहून दुचाकीवर एमडी ड्रग्ज घेऊन येणार्या दोन पेडलर्सना पकडले. त्यांच्याकडून 2.81 किलो एमडी जप्त करण्यात आले. चौकशीत त्यांनी हे ड्रग्ज गवलीपुर्यातील नाझिम, राजा, सोनू, बाबा आणि अन्य एकाच्या सांगण्यावरून आणल्याचे सांगितले. या कारवाईनंतर हे मुख्य आरोपी फरार झाले आहेत. तपासात असे समोर आले आहे की, हेच आरोपी फायनान्सर होते आणि पैसे जमा करून मुंबईहून एमडी ड्रग्ज आणून अमरावतीत विकायचे. पोलिसांनी 1 जानेवारी ते 10 एप्रिल दरम्यान गांजाच्या 4 आणि एमडीच्या 9 कारवाया केल्या आहेत. गांजा प्रकरणी 11 आरोपी तर एमडी प्रकरणी 44 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 110 किलो 925 ग्रॅम गांजा आणि 2 किलो 445 ग्रॅम 192 मिली एमडी जप्त केले आहे. या मालाची किंमत 3 कोटी 72 लाख 62 हजार 700 रुपये आहे, तर वाहनांसह एकूण 3 कोटी 98 लाख 17 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे.
नागपुरी गेट परिसरातून चालायचे रॅकेट-पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीत एमडी ड्रग्जचा अवैध व्यवसाय मुख्यत्वे नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चालत होता. गेल्या तीन वर्षांपासून हा व्यवसाय सुरू आहे. आरोपी तरुणांना पैशांचे आमिष दाखवून मुंबईला माल आणण्यासाठी पाठवायचे. पैशांच्या हव्यासामुळे हे पेडलर्स कोणताही विचार न करता मुंबईहून माल आणत असत आणि शहरात तरुणांना या व्यसनाच्या आहारी लावून तस्कर पैसे कमावत होते.
फरार आरोपींमध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्य-सूत्रांच्या माहितीनुसार, एमडी ड्रग्ज प्रकरणात सध्या 5 आरोपी फरार आहेत. विशेष म्हणजे यातील चार आरोपी एकाच कुटुंबातील असून ते या अवैध व्यवसायात गुंतलेले आहेत. हे सदस्य आपापसात पैसे गोळा करून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज मुंबईहून आणत असत आणि अमरावतीसह आसपासच्या तालुक्यांमध्ये विकत असत.
आता अधिक सतर्क राहणे गरजेचे-तस्करांवर आणि पेडलर्सवर झालेल्या कारवायामुळे सध्या या व्यवसायावर अंकुश आला आहे. मात्र, तस्कर आता एमडीऐवजी इतर अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी किंवा नवीन मार्ग शोधण्याची शक्यता आहे. त्यामुळे ’ऑपरेशन वाईप आऊट’ अंतर्गत पोलीस आता अधिक सतर्क राहून प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवणार आहेत.




