शहीदांच्या स्वप्नातील भारत घडवायचा असेल, तर बुध्दीप्रामाण्यवादी व्हा
प्रा.मधुकर जाधव यांचे प्रतिपादन

* विद्यापीठात शहीद दिनानिमित्त व्याख्यानमाला
अमरावती /24 मार्च : शहीदांच्या स्वप्नातील वैभवशाली भारत घडवण्यासाठी आजच्या युवकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून बुद्धीप्रामाण्यवादी होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. मधुकर जाधव यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास व राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित ’शहीदांच्या स्वप्नातील भारत’ या विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
देशाची एकात्मता आणि विविधता टिकवण्यासाठी केवळ क्रांतीवीरांचे अनुकरण न करता त्यांच्या विचारांमागचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. भगतसिंगांनी लाला लजपत राय यांच्या निधनाचा सूड घेतानाच, भारतीयांचा आवाज ब्रिटिशांच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी विधानसभेत स्फोट केला होता. त्यांचा हेतू कोणाला मारण्याचा नसून अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचा होता. तुरुंगातील भेदभावाविरुद्ध त्यांनी केलेले उपोषण आणि बाबू गेनू यांनी स्वदेशीसाठी दिलेला लढा, हा आजही युवकांसाठी मार्गदर्शक आहे. अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी विकसित भारतासाठी युवकांच्या योगदानावर भर दिला. यावेळी व्यासपीठावर अधिसभा सदस्य नितीन टाले, कैलास चव्हाण, संचालक डॉ. निलेश कडू व डॉ. राजीव बोरकर उपस्थित होते. प्रारंभी संत गाडगे बाबा, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भगवान किनाके यांनी सूत्रसंचालन केले. अवघ्या 23 व्या वर्षी भगतसिंगांनी शेकडो पुस्तके वाचून प्रगल्भ विचार मांडले होते. आजच्या तरुण पिढीने केवळ इतिहास न वाचता त्यातील त्यागाचा वारसा पुढे नेण्यासाठी अभ्यासू वृत्ती आणि जिद्द बाळगणे आवश्यक आहे, असा संदेश मान्यवरांनी यावेळी दिला.




