पी.आर.पोटे पाटील फार्मसी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ

अमरावती/12एप्रिल: पी. आर. पोटे एज्युकेशनल ग्रुपद्वारे संचालित पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, अमरावती येथे नुकताच उन्हाळी – पदवीधर विद्यार्थ्यांचा पदवी वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. हा समारंभ समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष महत्त्वाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले. या समारंभाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दिप्ती बी. रुईकर मॅडम उपस्थित होत्या. तसेच उपप्राचार्य प्रा. प्रशांत जे. बुरंगे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्या डॉ. दिप्ती बी. रुईकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेल्या शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर चालत विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करावा. तसेच विद्यार्थी जीवनात यशस्वी होत असताना शिक्षक-विद्यार्थी नात्यात आपुलकी, विश्वास आणि सन्मान यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया ठाकरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. दिप्ती बोंडे मॅडम यांनी केले. या पदवी वितरण समारंभाला पदवीधर विद्यार्थी, सध्याचे विद्यार्थी, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




