शिवजयंतीनिमित्त उड्डाणचे रक्तदान शिबीर
60 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अमरावती /22 फेब्रुवारी : शिवजयंतीच्या प्रेरणादायी पर्वावर उड्डाण इंजिनीअर्स मल्टिपर्पज सोसायटी, अमरावती यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. समाजभान जपणार्या अभियंत्यांची ही संस्था सातत्याने समाजकार्य, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम (खपर्पेींरींळेप) क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असते. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून युवकांना सकारात्मक कार्यासाठी प्रेरित करणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमांच्या माध्यमातून समाजाप्रती आपली बांधिलकी दृढ करण्याचा उड्डाणचा सातत्यपूर्ण प्रयत्न असून, समाजासाठी काहीतरी देणे हीच संस्थेची कार्यसंस्कृती असल्याचे या शिबिरातून अधोरेखित झाले. या शिबिराला तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि एकूण 60 युवा रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. संस्थेचे अध्यक्ष इंजी. निलेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच पी.डी.एम.एम.सी. रक्तपेढी, अमरावती येथील संपूर्ण वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीवर्ग यांनी नियोजनबद्ध व सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन प्रक्रिया पार पाडली. रक्तदात्यांची आरोग्य तपासणी, नोंदणी व रक्तसंकलन या सर्व प्रक्रिया शिस्तबद्ध रीतीने पूर्ण करण्यात आल्या, ज्यामुळे शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.




