बापाचा पोटच्या मुलावरच चाकूने हल्ला, मुलगा गंभीर
बालाजी नगर भागातील धक्कादायक घटना

* दारूच्या नशेत रोजची कटकट कारणीभूत
* व्यसनमुक्ती केंद्रानंतरही वाद मिटलाच नाही
अमरावती /11 फेब्रुवारी : शहराच्या कठोरा रोडवरील बालाजी नगर भागात बाप-लेकाच्या घरगुती वादातून रक्ताचा सडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुलाच्या दारूच्या व्यसनाला कंटाळलेल्या वडिलांनी संतापाच्या भरात पोटच्या गोळ्यावरच चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात 40 वर्षीय सचिन अरविंद मानेकर हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी वडील अरविंद मानेकर यांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात नोकरीला असलेला सचिन हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. मुलाचे हे व्यसन सोडवण्यासाठी वडिलांनी त्याला नागपूर येथील व्यसनमुक्ती केंद्रातही भरती केले होते. तिथून परत आल्यानंतरही सचिनच्या वागण्यात सुधारणा झाली नाही, उलट घरात दररोज खटके उडू लागले. बुधवारी पुन्हा या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. सुरुवातीला सचिनने चाकू काढल्याचे बोलले जात होते, मात्र नंतर संतापाने लाल झालेल्या वडील अरविंद मानेकर यांनी स्वतःच घरातील चाकू आणून घराच्या अंगणात सचिनवर सपासप वार केले. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आणि न्यायवैद्यक चमू घटनास्थळी दाखल झाले. सध्या परिसरात शांतता असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
जीवघेणा हल्ला केंद्र ठरले स्वत:चे घर-मुलाचे व्यसन सुटावे म्हणून वडिलांनी मोठे प्रयत्न केले होते. नागपूरच्या व्यसनमुक्ती केंद्रातून आल्यावरही घरातील वादाची मालिका सुरूच होती. अखेर सततच्या त्रासामुळे वडिलांचा संयम सुटला आणि रागाच्या भरात त्यांनी स्वतःच्या मुलावरच जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे एका हसत्या-खेळत्या कुटुंबाची वाताहत झाली आहे.




