मेळघाटात चालकाचा अतिआत्मविश्वास नडला

शिवाझरी घाटात पाच निष्पापांचा मृत्यू

* पाच कुटुंब आले उघड्यावर

अमरावती / 24 फेब्रुवारी : मेळघाटातील शिवाझरी घाटात रविवारी रक्ताचा सडा पडला. देठतलाईचा बाजार करून परतणार्‍या प्रवाशांनी भरलेले वाहन चालकाच्या एका ’धडकी’ मारण्याच्या नादात 60 फूट खोल दरीत कोसळले. वाहनाची क्षमता संपली असतानाही, प्रवाशांना खाली न उतरवता घाट चढवण्याचा ’मोसम’ चालकाला चांगलाच नडला. या भीषण अपघातात कंजोली गावातील चार जणांसह एकूण पाच जणांचा करुण अंत झाला, तर 11 जण मृत्यूशी झुंज देत आहेत. धारणी पोलिसांनी आरोपी चालकाला बेड्या ठोकल्या असून संपूर्ण मेळघाटात या घटनेने संतापाची लाट उसळली आहे.
रविवारी सायंकाळी मेळघाटातील रस्ते किंकाळ्यांनी हादरले. कंजोली येथील नागरिक देठतलाईचा आठवडी बाजार आटोपून आपल्या घराकडे निघाले होते. 20 ते 25 प्रवाशांनी खचाखच भरलेले बोलेरो पिकअप वाहन शिवझरी घाटात आले. पहिल्या लहान चढावर चालकाने खबरदारी घेत प्रवाशांना खाली उतरवले आणि गाडी वर चढवली. मात्र, काही अंतरावर असलेल्या मोठ्या चढावर चालकाचा अतिआत्मविश्वास नडला. प्रवाशांनी खाली उतरण्याची विनंती करूनही चालकाने गाडी चढते असे म्हणत ’मोसम’ घेण्याचा प्रयत्न केला. भर उन्हात आणि प्रवासी क्षमता जास्त असल्याने गाडीने चढाच्या मध्यभागीच दम सोडला. इंजिनचा आवाज वाढला, पण चाके पुढे सरकण्याऐवजी मागे घसरू लागली.
या थरारक प्रसंगी गाडीच्या टपावर बसलेले राजेश धाराशिंबे आणि इतर चार जणांनी प्रसंगावधान राखत खाली उड्या मारल्या. त्यांनी चाकाखाली मोठे दगड लावून गाडी थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्याने दगडही निष्प्रभ ठरले. अनियंत्रित झालेले वाहन थेट 60 फूट खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात सुकहरी बिसराम धांडे (45), सीताराम पटेल सेलुकर (58), बाबूलाल बुढा दहिकर (56), किसन तानु धांडे (58) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सोमवारी उपचारादरम्यान रिताबाई मंगल राठोड (45) यांचा मृत्यू झाला. या अपघाताने अनेक हसती-खेळती कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. बाबूलाल दहिकर यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी आहे, तर सुकहरी धांडे यांच्या निधनाने त्यांचा मुलगा पोरका झाला आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली आहे. आरोपी चालक दीपक सज्जुलाल सावलकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, मेळघाटातील ही जीवघेणी वाहतूक कधी थांबणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

घटनेतील चालक कोठडीत

या भीषण अपघाताला कारणीभूत ठरलेला चालक दीपक सज्जुलाल सावलकर याला धारणी पोलिसांनी अटक केली आहे. मोसम घेण्याच्या नादात आणि नियमांची पायमल्ली केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता आणि प्रवाशांचे साहित्य विखुरले होते. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. मेळघाटातील दुर्गम भागात होणारी ही ’ओव्हरलोड’ वाहतूक आणखी किती बळी घेणार, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

जेव्हा दगडही ठरले कागदासारखे!

प्रत्यक्षदर्शी राजेश धाराशिंबे यांनी सांगितलेला थरार अंगावर शहारे आणणारा आहे. गाडी मागे घसरू लागताच तरुणांनी टायरखाली दगड लावले, पण 20 प्रवाशांचे ओझे आणि गाडीचा वेग एवढा होता की, ते दगड क्षणार्धात उडाले. अवघ्या काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले आणि दरीतून फक्त किंकाळ्यांचा आवाज घुमू लागला.

पाच कुटुंबांचा आधार हरपला

या काळजाचा ठोका चुकवणार्‍या घटनेत सुकहरी बिसराम धांडे (45), सीताराम पटेल सेलुकर (58), बाबूलाल बुढा दहिकर (56) आणि किसन तानु धांडे (58) या कंजोली येथील चार व्यक्तींचा रविवारी रात्रीच मृत्यू झाला. तर, सोमवारी सकाळी इर्विन रुग्णालयात उपचारादरम्यान रिताबाई मंगल राठोड (45) यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात बाबूलाल दहिकर यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी आहे, तर सुकहरी धांडे यांच्या मृत्यूने त्यांचा मुलगा पोरका झाला आहे. एकाच गावातील पाच जण दगावल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मृतकाच्या कुटुंबियांना वार्‍यावर सोडणार नाही

मेळघाटातील कांजोळी येथे घडलेल्या काळजाचा थरकाप उडवणार्‍या भीषण अपघातात सुखराम धांडे (45), सीताराम सेलुकर (58), बाबुलाल दहिकर (56), किसन धांडे (58) व एका महिलेचा करुण अंत झाला. या घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. माहिती मिळताच खासदार बळवंत वानखडे यांनी तातडीने कांजोळी गाठून मृतांच्या वारसांचे सांत्वन केले. कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर पाहून खासदार भावूक झाले. या कठीण काळात मी तुम्हाला वार्‍यावर सोडणार नाही, असा धीर त्यांनी दिला.

आ. रवी राणांनी विधिमंडळात वेधले लक्ष 

मेळघाटातील राणीगाव कांजोली मार्गावरील शिवाझिरी घाटात रविवारी संध्याकाळी प्रवाशांनी भरलेली मालवाहू गाडी खोल दरीत कोसळून पाच निष्पाप आदिवासी बांधवांचा करुण अंत झाला. या काळजाचा थरकाप उडविणार्‍या भीषण दुर्घटनेचे पडसाद आज राज्य विधिमंडळात उमटले. बडनेराचे आमदार रवी राणा यांनी विशेष लक्षवेधी सूचनेद्वारे या विषयावर सरकारला धारेवर धरले. अत्यंत दुर्गम भागात झालेल्या या अपघातामुळे संपूर्ण मेळघाटात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत आणि जखमींना विनामूल्य दर्जेदार उपचार देण्याची आग्रही मागणी राणा यांनी सभागृहात लावून धरली.

संबंधित बातम्या

Back to top button