धामोरीजवळ तरुणाची हत्या
अमरावती-दर्यापूर मार्गावरील घटना

रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला तरुण
पसार अज्ञात मारेकर्यांचा शोध सुरू
अमरावती/29 जुलै- अमरावती ते दर्यापूर राज्य महामार्गावरील धामोरी गावाजवळ बुधवार रात्रीच्या वेळी एका तरुणाची पाठीत धारदार चाकू खुपसून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. राहुल राजू रावेकर असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून तो वाठोडा शुक्लेश्वर येथील रहिवासी आहे. तो रात्रीच्या दरम्यान अमरावती वरून गवंडी काम करून घरी परतत असतांना हि घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच खोलापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला व तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आज बुधवारी रात्री साडेआठ ते पाऊणे नऊ वाजेच्या सुमारास अमरावती-दर्यापूर मार्गावरून जाणार्या काही वाटसरूंना धामोरी गावाजवळ रस्त्याच्या कडेला एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्या तरुणाच्या पाठीत धारदार चाकू खोलवर खुपसलेला होता आणि तो निपचित पडला होता. हा भयंकर प्रकार पाहून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले. तेथील ग्रामस्थांनी व नागरिकांनी विलंब न करता तात्काळ खोलापूर पोलिसांना या घटनेबाबत कळवले. माहिती मिळताच खोलापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह ताब्यात घेतला आणि रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवून दिला. प्राथमिक तपासात मृतकाची ओळख पटली असून तो वाठोडा शुक्लेश्वर येथील रहिवासी राहुल राजू रावेकर असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, ही हत्या नेमक्या कोणत्या कारणावरून किंवा जुन्या वैमनस्यातून करण्यात आली, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. हत्येची ही भयंकर घटना घडवून आणल्यानंतर अज्ञात आरोपी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या घटनेमुळे रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. खोलापूर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात मारेकर्यांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. आरोपींच्या शोधासाठी विशेष शोध पथके तयार करण्यात आली असून संशयितांची विचारपूस सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच आरोपींना बेड्या ठोकल्या जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हत्येचे कारण अस्पष्ट ?-अमरावती-दर्यापूर मार्गावरील धामोरी गावाजवळ रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास वाठोडा शुक्लेश्वर येथील रहिवासी राहुल राजू रावेकर या तरुणाची पाठीत चाकू खुपसून निर्घृण हत्या करण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. खोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. हत्येचे कारण अस्पष्ट असून पसार अज्ञात मारेकर्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे.




