शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी
बदलत्या हवामानाचा परिणाम, जिल्ह्यात साथीचे आजार वाढले

अमरावती/13 सप्टेंबर– बदलते हवामान आणि पावसातील खंडामुळे अमरावती जिल्ह्यात सर्दी खोकला ताप घसा दुखणे अंगदुखी डोकेदुखी आणि अशक्तपणाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये दररोज 250 ते 300 रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
काही रुग्णालयांमध्ये खाटा भरू लागल्या असून गंभीर रुग्णांना दाखल करून उपचार करावे लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणानंतर अचानक ऊन आणि त्यानंतर पाऊस तसेच रात्री जाणवणारा गारवा यामुळे हवामानात सतत बदल होत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक दिसत आहे. पूर्वी दररोज 50 ते 60 रुग्ण तपासणीसाठी येत होते. आता ही संख्या 250 ते 300 पर्यंत पोहोचली आहे. अनेक रुग्णांना काही दिवस ताप कायम राहणे अंगदुखी अशक्तपणा आणि थकवा जाणवत आहे. तापाच्या काही रुग्णांच्या रक्त तपासणीत रक्तपेशींची संख्या कमी आढळल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. मात्र रक्तपेशी कमी होणे म्हणजे प्रत्येक वेळी डेंग्यू किंवा गंभीर आजार असे नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना पुरेसे पाणी पिणे पौष्टिक आहार घेणे विश्रांती घेणे आणि गर्दीच्या ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. घराभोवती पाणी साचू न देणे आणि स्वच्छता राखणेही गरजेचे आहे. ताप अनेक दिवस कायम राहिल्यास किंवा अशक्तपणा वाढल्यास स्वतःहून औषधे न घेता डॉक्टरांचा सल्ला घेऊन रक्त तपासणी करावी.





