चित्रा चौक उड्डाणपुल वाहतुकीसाठी होणार खुला

चांदनी चौक मार्गावर वाहनांना पूर्णबंदी

1 मे ला लोकार्पण होण्याची शक्यता

अमरावती / 18 फेब्रुवारी – गेल्या आठ वर्षांपासून रेंगाळलेल्या चित्रा चौक ते नागपुरी गेट उड्डाणपुलाचे काम आता निर्णायक टप्प्यावर आले असून 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा पूल जनतेसाठी खुला करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या कामाला गती देण्यासाठी टांगा पडाव ते चांदनी चौक दरम्यानचा मार्ग 18 फेब्रुवारीच्या रात्रीपासून 4 मार्चपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या तडाख्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि चाफेकर कन्स्ट्रक्शन कंपनीने कामाचा वेग वाढवला असून, पुढील 70 दिवसांत बांधकाम आणि रंगरंगोटी पूर्ण करून हस्तांतरणाची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
2017-18 मध्ये सुरू झालेले हे काम अडीच वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र सात वर्षे उलटूनही काम अपूर्ण राहिल्याने माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या विलंबाबद्दल कडक ताशेरे ओढत कामाचा अहवाल मागवला आहे. आता 18 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान खांब क्रमांक 22, 23 आणि 24 वर गर्डर टाकण्याचे काम युद्धपातळीवर चालणार असून, त्यानंतर 15 मार्चपर्यंत स्लॅब टाकणे आणि क्युरिंगची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग बंद ठेवण्यात आला असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रात्रीस काम करण्याची मागणी-उद्यापासून रमजान महिना सुरू होत असल्याने मुस्लिम बहुल भागात वर्दळ वाढणार आहे. टांगा पडाव ते चांदनी चौक दरम्यान वाहनांना बंदी असल्यामूळे वाहतूकीची होणारी कोंडी पाहता उड्डाणपुलाचे काम रात्री करावे आणि दिवसा रस्ता खुला ठेवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अस्लम बाबा यांच्या नेतृत्वात नासिर बेग, एजाज बेग, सोहेल मंदेवाले, अन्नूभाई शरबतवाले आणि आरिफभाई यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button