‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ पर्यंत ट्रेक करणारे बच्चू कडू ठरणार पहिले राजकारणी
जिल्ह्यात सर्वत्र चर्चा कौतुकाचा वर्षाव

210 किमी लांबीची केली होती मेळघाट पायी यात्रा
संविधान व गीता घेऊन मोहीम पूर्ण
अमरावती/ 13एप्रिल– जगातील सगळ्यात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी म्हणजेच ’बेस कॅम्प’वर पोहचण्यासाठी विदर्भाचे लोकनेते आ. बच्चू कडू यांनी ऐतिहासिक चढाई सुरू केली आहे. रक्ता गोठवणार्या थंडीत आणि प्राणवायूच्या कमतरतेतही जिद्दीने पाऊल पुढे टाकत त्यांनी हा टप्पा गाठण्याचा निर्धार केला असून, असे धाडस करणारे ते देशातील पहिलेच राजकारणी ठरणार आहेत.
गिर्यारोहकांचे स्वप्न असलेल्या एव्हरेस्टचे आकर्षण सर्वांनाच असते, पण तिथे पोहचण्यासाठी लागणारे धाडस आणि सराव आ. बच्चू कडू यांनी करून दाखवला आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून त्यांनी या कठीण प्रवासासाठी विशेष तयारी केली होती. सध्या ते बुद्धभूमी नेपाळमध्ये असून हिमालयाच्या कुशीतून त्यांनी आपला प्रवास सुरू केला आहे. या मोहिमेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ही चढाई खूप कठीण आहे. उणे 10 अंश सेल्सिअस तापमान असल्याने अंग काकडून जाते, पण सतत चालत राहिल्यामुळे शरीरातील ऊब टिकून आहे. उंचावर गेल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतोय आणि रात्रीची झोपही उडाली आहे, तरीही ध्येयाकडे जाण्याची जिद्द कायम आहे.
विशेष म्हणजे, आ. कडू यांनी यापूर्वी शेतकरी, कष्टकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी मोठ्या पदयात्रा काढल्या होत्या, मात्र ही यात्रा त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी आणि शारीरिक क्षमतेच्या परीक्षेसाठी निवडली आहे. या प्रवासात त्यांनी भारतीय संविधान आणि श्रीमद्भगवद्गीता हे दोन पवित्र ग्रंथ सोबतीला नेले आहेत. अमरावती जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या या धाडसी मोहिमेची मोठी चर्चा रंगली आहे. विमान प्रवासात दिसणारा हिमालय आता प्रत्यक्ष डोळ्यासमोर असून बर्फवृष्टीचा आनंद घेत ते पुढे सरकत आहेत. सोमवार संध्याकाळपर्यंत ते या तळावर पोहचतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. राजकारणाच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ काढत त्यांनी मारलेली ही मजल खरोखरच कौतुकास्पद ठरत आहे.
जिद्दीचा प्रवास: मेळघाट ते हिमालय-फेब्रुवारी महिन्यात मेळघाटची 210 किमीची पदयात्रा पूर्ण केल्यानंतर आ. बच्चू कडू यांनी आता थेट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर स्वारी केली आहे. उणे दहा अंशात बर्फाची चादर ओढलेल्या हिमालयात संविधान आणि गीता घेऊन जाणारे ते पहिलेच आमदार ठरले आहेत.




