अयानचा पीडितेवर अश्लील स्पर्श; पीडित मुलीचा शारीरिक छळ केल्याचा ठपका
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात दुसरी पीडिताही आली समोर

अयानवर नवीन फौजदारी कलम समाविष्ट
एसआयटी पथकाकडून अयानची कसून चौकशी सुरू
परतवाडा/26एप्रिल- शहरात खळबळ उडवून देणार्या अश्लील चित्रफित प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले असून, मुख्य आरोपी अयान अहमद याच्या कृत्यांमुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच एक 16 वर्षीय अल्पवयीन पीडिता समोर आली असून तिने आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला आहे. मुख्य आरोपी अयान याने आपल्या मर्जीशिवाय आपल्याला अश्लील स्पर्श केला आणि आपला शारीरिक छळ केला, अशी धक्कादायक माहिती पीडितेने विशेष तपास पथकातील (एसआयटी) महिला अधिकार्यांसमोर दिली आहे. या नवीन खुलाशामुळे पोलिसांनी मूळ गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 74 समाविष्ट केले असून पुढील तपास वेगाने सुरू केला आहे.
शहरात भीतीचे वातावरण निर्माण करणार्या या सेक्स स्कँडलचा तपास करताना अयान अहमद तन्वीर अहमद याच्या भ्रमणध्वनीमध्ये अनेक आक्षेपार्ह बाबी पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. 18 एप्रिल रोजी त्याला अटक करण्यात आल्यानंतर पोलीस कोठडीत त्याची चौकशी सुरू होती. यादरम्यान, अयानच्या जाचाला बळी पडलेली ही 16 वर्षीय मुलगी धैर्याने पुढे आली. तिने महिला पोलीस अधिकार्यांकडे दिलेल्या बयाणात स्पष्ट केले की, अयानने तिच्या इच्छेविरुद्ध तिला स्पर्श करून तिचा विनयभंग केला. या घटनेमुळे पीडिता प्रचंड मानसिक दबावा खाली होती, मात्र एसआयटी पथकाने तिला विश्वा सात घेतल्यानंतर तिने अयानच्या काळ्या कृत्यांचा भांडाफोड केला आहे.
मुख्य आरोपी अयान अहमद हा शिकवणी वर्गाला जाणार्या मुलींवर पाळत ठेवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करायचा, असे तपासात समोर येत आहे. अश्लील शेरेबाजी करणे आणि मुलींचा मानसिक छळ करणे या गोष्टी त्याच्याकडून वारंवार घडत होत्या. या नवीन पीडितेने समोर येऊन तक्रार दिल्याने अयान विरुद्धचा पुरावा अधिक भक्कम झाला आहे. पोलिसांनी या नवीन माहितीच्या आधारे गुन्ह्याची व्याप्ती वाढवली असून अयानवर कठोर कलमे लावण्यात आली आहेत. या गंभीर गुन्ह्यामुळे अयानचा पोलीस कोठडीतील मुक्काम आता अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. विशेष तपास पथकाद्वारे अयानची कसून चौकशी केली जात असून त्याच्या भ्रमणध्वनीमधील इतर माहितीचाही तांत्रिक तपास केला जात आहे. अल्पवयीन मुलींना लक्ष्य करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्या या नराधमाच्या विरोधात शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मूळ गुन्ह्यात अयानने केलेल्या अश्लील स्पर्शामुळे आणि पीडितेच्या छळामुळे आता कायद्याचा फास त्याच्याभोवती अधिक घट्ट झाला आहे. परतवाडा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून अयानने आणखी किती मुलींना अशा प्रकारे त्रास दिला आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.




