तरुणीचे अपहरण करून अत्याचाराचा प्रयत्न
कुख्यात गुंडाने भररस्त्यातून कारमध्ये ओढले

गाडगे नगर हद्दीतील घटनेने शहर हादरले
अमरावती / 5 फेब्रुवारी – जिमवरून घरी परतणार्या 26 वर्षीय तरुणीला वाटेतच अडवून, तिचे कारने अपहरण करण्यात आले. किरण शेवणे नावाच्या सराईत गुंडाने तरुणीला वलगावच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने प्रतिकार केला असता तिला बेदम मारहाण करून अश्लील शिवीगाळ करण्यात आली. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास पीडित तरुणी कॉटन मार्केट भागातील जिममधून घरी जात होती. यावेळी संशयित आरोपी किरण शेवणे (30) याने काळ्या रंगाच्या कारने (क्र. चक-27-2812) तिचा पाठलाग करून तिला गाठले. त्याने बळजबरीने तरुणीला कारमध्ये बसवले आणि दरवाजे बंद करून थेट वलगाव परिसरातील जंगलात नेले. तिथे त्याने तरुणीशी अश्लील चाळे करून विनयभंग केला. तरुणीने आरडाओरड केली असता, आरोपीने तिच्या चेहर्यावर थुंकून तिचा अपमान केला आणि तिच्या कपड्यांशी छेडछाड करत अत्याचाराचा प्रयत्न केला. तरुणीने विनवणी केल्यानंतर आरोपीने तिला शहरात परत आणून सोडले, पण जाताना तिच्या कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिली. पीडितेने हिंमत दाखवत आपल्या मैत्रिणीला आणि भावाला बोलावून घेतले. यावेळी आरोपीने तिच्या भावालाही मारहाण केली आणि पसार झाला. गाडगे नगर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून किरण शेवणे विरुद्ध 74, 76, 78, 79, 115 (2), 140 (1), 296 आणि 351 (3) या कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.
तडीपार गुंडाची पुन्हा दहशत-आरोपी किरण शेवणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर हत्येसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला यापूर्वी तडीपारही करण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी त्याने पीडितेच्या अंगावर कार घालण्याचाही प्रयत्न केला होता. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या आरोपीने तरुणीचा मोबाईल क्रमांक मिळवून तिला वारंवार त्रास दिल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.




