धारणी ते भोकरबर्डी मार्गाच्या डांबरीकरणाला अखेर मुहूर्त

प्रशासनाकडून कामाला सुरुवात झाल्याने चक्का जाम आंदोलन मागे

* मेळघाटच्या विकासासाठी जनता एकवटली अन लढा यशस्वी झाला

अमरावती / 12 मार्च : धारणी ते भोकरबर्डी या मुख्य रस्त्याच्या भीषण दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी पुकारलेल्या तीव्र एल्गारानंतर प्रशासनाला अखेर जाग आली असून 12 मार्चपासून या मार्गाच्या नूतनीकरणाचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे.
या सकारात्मक प्रतिसादामुळे 13 मार्च रोजी होणारे ’चक्का जाम’ आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असले, तरी कामात दिरंगाई किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा देऊन लोकशक्तीने प्रशासनावर जरब बसवली आहे. धारणी तालुक्यातील दळणवळणाचा महत्त्वाचा दुवा असलेला हा मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांच्या विळख्यात होता. वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी धारणी तालुका सहकारी शेती खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष श्रीपाल पाल यांच्या नेतृत्वाखाली भोकरबर्डी वन नाक्यावर मोठ्या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. जनतेचा हा वाढता रोष पाहून यंत्रणा खडबडून जागी झाली आणि तातडीने डांबरीकरणाचे साहित्य घटनास्थळी दाखल झाले. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वसामान्य जनतेच्या एकजुटीमुळे हा लढा यशस्वी झाला आहे. अन्यायाविरुद्ध एकत्र आल्यास कठीण कामेही मार्गी लागतात, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मात्र, हे आंदोलन पूर्णपणे संपलेले नसून केवळ स्थगित आहे. जर कामाचा दर्जा खालावला किंवा काम संथ गतीने चालले, तर दुसर्‍याच दिवशी पुन्हा तीव्र चक्का जाम आंदोलन छेडले जाईल, असा खणखणीत इशारा श्रीपाल पाल, उपाध्यक्ष चंद्रशेखर सपाटे आणि व्यवस्थापक सतीश पटोरकर यांनी दिला आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती पत्राद्वारे उपविभागीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनालाही कळवण्यात आली आहे.

गुणवत्तेकडे राहणार बारीक लक्ष

रस्त्याचे काम सुरू झाले असले तरी ते दर्जेदार व्हावे ही ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. नियोजित वेळेत आणि योग्य गुणवत्तेसह काम पूर्ण न झाल्यास गावकर्‍यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

संबंधित बातम्या

Back to top button