अमिताभ बच्चन यांना बुलेटप्रुफ केबिनमध्ये घुसून मारणार
गोल्डी ढिल्लोनच्या धमकीने उडाली खळबळ

नवी दिल्ली/16 नोव्हेंबर : महानायक अर्थात दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना यापूर्वी दोन वेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अमिताभ बच्चन याचे जलसा निवासस्थान बॉम्बने उडवू अशी धमकी देण्यात आली होती. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांच्या भेटीवेळी स्वत:ला बुलेटप्रुफ केबिनमध्ये बंद करून घेतल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने परदेशात राहणार्या एका गुंडाशी संबंधित दोन शूटर्सना अटक केली. यानंतर अमिताभ बच्चन यांनी ‘वाचलो’ अशी पोस्ट केली. मात्र दोन शूटर्सच्या अटकेनंतर आता गँगस्टर गोल्डी ढिल्लोन याने अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांना मारण्याची धमकी दिली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करताना गोल्डी ढिल्लोनने धमकी दिली की, दोन्ही शूटर्सना अन्य कोणत्याही गँगशी जोडू नये. कारण दोघांच्या अटकेमुळे कोणताही कट उधळला गेलेला नाही. मुंबईत आमचे आणखी 200 जण तयार आहेत, असा खळबळजनक दावा गोल्डी ढिल्लोनने त्याच्या पोस्टमधून केला. गोल्डी ढिल्लोन म्हणाला की, शीख समाजा विरोधात बोलणार्यांना आम्ही आमचा शत्रू मानणार. दोघांनी (अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन) कितीही बुलेटप्रूफ केबिन तयार केले, तरी आम्ही त्यांच्यावर हल्ला करणार आणि केबिनमध्येच त्यांना मारणार, अशी धमकी गोल्डी ढिल्लोनने दिली आहे. धक्कादायक म्हणजे त्याने ही पोस्ट करताना 1984 आणि यांसह विविध हॅशटॅगचा वापर केला आहे. त्यामुळे गोल्डी ढिल्लोन याने फेसबूक पोस्ट कुठून केली? याचा शोध पोलीस घेत आहेत.





