अंबानगरीत ढोलताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन
सर्वत्र गुलाल उधळत भक्तांचा अथांग उत्साह

पोलीस बंदोबस्तात शोभायात्रेत भक्तांचा जल्लोष
590 सार्वजनिक मंडळांमध्ये चैतन्याचे वातावरण
अमरावती /14 सप्टेंबर– विद्येची आराध्य देवता गणरायाचे सोमवारी भाद्रपद चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर अमरावती शहर व ग्रामीण भागात अत्यंत जल्लोषात आगमन झाले. ढोलताशांचा दणदणाट, ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर आणि गुलालाच्या उधळणीत लाडक्या बाप्पाची घरोघरी तसेच 590 सार्वजनिक मंडळांमध्ये थाटात स्थापना करण्यात आली. मातीच्या देखण्या मूर्ती, सुंदर मखर, दिव्यांची रोषणाई, पारंपरिक नृत्ये, राजकमल चौकातील महाआरती आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त यामुळे अवघा परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला असून पुढील 12 दिवस चालणार्या या महाउत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
सोमवारी सकाळपासूनच अमरावतीच्या गल्लीबोळांत आणि खेड्यापाड्यांत सणाचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सर्वांनी बाप्पाच्यास्वागतासाठी रस्त्यांवर तोबा गर्दी केली होती. डोक्यावर बाप्पाच्या नावाच्या पट्ट्या बांधून चिमुरडे ताशांच्या तालावर मनसोक्त थिरकताना दिसत होते. यावर्षी नागरिकांनी मातीच्या मूर्ती आणण्यावर जास्त भर दिला. शहरातील नवाथे प्लॉट, गोपालनगर, नेहरू मैदान, सायन्सकोर, गांधी चौक, दस्तूर नगर, यशोदा नगर, पंचवटी चौक, कठोरा नाका, गाडगेनगर अशा प्रमुख भागांत सकाळपासून बाप्पाच्या सुंदर मूर्ती घेण्यासाठी भाविकांची कुटुंबे दाखल झाली होती. नेहरू मैदानात तर मातीच्या मूर्तींची मोठी रेलचेल होती.
घरोघरी आणलेल्या बाप्पाची सुंदर मखरांमध्ये स्थापना करण्यात आली. फुलांचे देखणे हार, कंठी माळा आणि रंगीबेरंगी दिव्यांच्या झगमगाटाने संपूर्ण घर प्रफुल्लित झाले. विधीवत पूजा, मंगल आरती आणि प्रसादाच्या वाटपानंतर पुढचे 12 दिवस घरात चैतन्य टिकून राहणार असल्याने प्रत्येकाच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. बाप्पाला घरी नेताना वाजणारे ढोल आणि उधळणारा गुलाल यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले. शहरातील 590 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील आपल्या लाडक्या बाप्पाचे मोठ्या दिमाखात स्वागत केले. मध्यवर्ती भागातील आझाद हिंद मंडळ, लक्ष्मीकांत मंडळ, निळकंठ व्यायाम मंडळ, पंचशील क्रीडा मंडळ, प्रभात क्रीडा मंडळ, बजरंग मंडळ, सुवर्णकार संघ, सराफा असोसिएशन, अनंत गणेशोत्सव मंडळ, विकास गणेशोत्सव मंडळ तसेच तपोवन परिसरातील हरिश्चंद्र पाटील यांच्या गणपतीसह अनेक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान झाले. खापर्डे बगीचा, श्रीकृष्ण पेठ, नमुना, राजापेठ, रुख्मिणीनगर भागातील आझाद गणेशोत्सव मंडळ, श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळ, रुख्मिणी गणेशोत्सव मंडळांतही बाप्पाची प्रतिष्ठापना उत्साहात पार पडली. महिलांच्या लेझीम, पारंपरिक नृत्ये आणि दिंडी पथकांनी मिरवणुकांची शोभा वाढवली. सुरक्षेसाठी संवेदनशील भागात विशेष लक्ष ठेवत 1 हजार 800 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी शहरात तैनात करण्यात आले आहेत.
राजकमल चौकात डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा -आझाद हिंद मंडळाच्या भव्य मिरवणुकीचा राजकमल चौकात महाआरतीने अत्यंत दिमाखदार समारोप झाला. यावेळी पहिल्यांदाच सादर झालेल्या भव्य आग आणि प्रकाश तंत्रज्ञान खेळाने उपस्थितांचे डोळे दिपवून टाकले. संगीत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगम या सादरीकरणात पाहायला मिळाला. हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या महाआरतीमुळे अवघा परिसर भक्तिमय झाला होता.
भव्य देखावे व तंत्रज्ञानाचा आविष्कार
यंदाच्या गणेशोत्सवात मंडळांनी उभारलेले देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. आझाद हिंद मंडळाने खाटू श्याम बाबा मंदिराचा देखावा उभारला आहे. नीळकंठ गणेशोत्सव मंडळाने जगन्नाथ पुरी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे, तर बजरंग गणेशोत्सव मंडळाने उज्जैनच्या महाकाल मंदिराचा विलोभनीय देखावा साकारला आहे. भाविकांना या देखाव्यांमधून धार्मिक स्थळांचे दर्शन घरबसल्या घडत आहे.





