शिक्षण विभागात सर्वसमावेशक आढावा बैठक

पटसंख्या वाढ, वाचन संस्कृती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विशेष भर

अमरावती/10 एप्रिल: महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षण सभापती डॉ. प्रीती रेवणे यांच्या अध्यक्षतेखाली 63 शाळांच्या मुख्याध्यापकांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली असून आगामी शैक्षणिक वर्षात पटसंख्या वाढवण्यासाठी आणि मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी आता शाळांनी कंबर कसली आहे.
शिक्षण विभाग आणि शिक्षण समितीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीचा मुख्य रोख महापालिका शाळांचा दर्जा उंचावण्याकडे होता. डॉ. प्रीती रेवणे यांनी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की केवळ शिकवणी पूर्ण करणे पुरेसे नसून मुलांच्या मनात अभ्यासासोबतच संस्कार आणि जीवनकौशल्ये रुजवणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक शाळेने आपल्या परिसरात लोकजागृती करावी आणि शिक्षकांनी घराघरात जाऊन पालकांशी थेट संवाद साधावा जेणेकरून जास्तीत जास्त मुले शाळेच्या उंबरठ्यावर येतील असे आवाहन त्यांनी केले. मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक शाळेत वाचन कोपरा किंवा सुसज्ज ग्रंथालय उभारण्याचे कडक निर्देश यावेळी देण्यात आले. वाचन स्पर्धा आणि गोष्टी सांगण्याचे कार्यक्रम घेऊन शाळांचे वातावरण आनंदी करावे अशी सूचनाही त्यांनी केली. याप्रसंगी मुख्याध्यापकांनी शाळा चालवताना येणार्‍या अडचणी आणि मनुष्यबळाची कमतरता यांचा पाढा वाचला ज्यावर उपाय म्हणून शिक्षकांसाठी नवीन अध्यापन पद्धतीचे प्रशिक्षण आणि लहान मुलांसाठी खेळणी देण्याचे ठरले. तसेच शाळांच्या सुरक्षिततेसाठी रक्षक नेमण्याबाबत प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. शिक्षण अधिकारी आणि समिती सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीने अमरावतीच्या शैक्षणिक विकासाला एक नवी दिशा दिली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button