देशात पहिल्यांदाच होणार ईव्हीएमची तपासणी

मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

शिंदे सेनेचा आमदार अडचणीत?

मुंबई /10 एप्रिल: ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम यंत्रांची ‘डायग्नोस्टिक टेस्ट’ (निदान चाचणी) करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. देशाच्या निवडणूक इतिहासात सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन नियमावलीनुसार होणारी ही पहिलीच चाचणी ठरणार आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत चांदिवली मतदारसंघात शिंदे गटाचे दिलीप लांडे आणि काँग्रेसचे नसीम खान यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. यामध्ये लांडे यांनी निसटता विजय मिळवला होता. मात्र, मतमोजणीत तफावत असल्याचा दावा करत नसीम खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेची दखल घेत न्यायमूर्तींनी ईव्हीएम तपासणीचे आदेश दिले आहेत.
येत्या 16 आणि 17 एप्रिल रोजी ही चाचणी पार पडणार आहे. बंगळुरूस्थित ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ चे तज्ज्ञ अभियंते या प्रक्रियेत सहभागी होतील. या अंतर्गत कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅटमधील मायक्रोकंट्रोलरच्या प्रोग्रामिंगची पडताळणी केली जाणार आहे. त्यानुसार निवडणूक निकालानंतर यंत्रातील डेटाशी छेडछाड झाली आहे का, याचा तांत्रिक शोध घेतला जाणार असून यंत्राच्या ‘बर्न मेमरी’मधील डेटा आणि प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी यांचा ताळमेळ तपासला जाणार आहे.
या निर्णयावर समाधान व्यक्त करताना नसीम खान म्हणाले की, हा लोकशाहीच्या विजयाचा पहिला टप्पा आहे. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आता तांत्रिक मोहोर उमटेल. या तपासणीमुळे आता विद्यमान निकालावर कायदेशीर टांगती तलवार निर्माण झाली असून, संपूर्ण देशाचे लक्ष या ‘डायग्नोस्टिक टेस्ट’च्या निष्कर्षाकडे लागले आहे.

बीईएलचे अभियंते करणार तपासणी

सर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल 2024 मधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 टक्के ईव्हीएमची पडताळणी करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे तज्ज्ञ अभियंते चांदिवलीतील कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅटमधील मायक्रोकंट्रोलरची तपासणी करणार आहेत. या प्रक्रियेत यंत्राच्या बर्न मेमरीमधील डेटा आणि प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी यांचा ताळमेळ तपासला जाणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button