उजेर खान विरुद्धही नवा गुन्हा दाखल

परतवाडा अत्याचार प्रकरणात अयानच्या अडचणी वाढल्या

पीडित मुलीचे धाडस तपासाला नवी दिशा

भ्रमणध्वनी मधून महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती

आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची आता सखोल चौकशी

अमरावती /20 एप्रिल- परतवाडा येथील बहुचर्चित लैंगिक शोषण प्रकरणात 15 वर्षीय पीडित मुलीने अत्यंत धैर्याने आपला जबाब नोंदवल्यामुळे मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद याच्या पाशात आता पोलिसांचा अधिकच फास आवळला गेला आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगवान केला असून, उजेर खान इकबाल खान या दुसर्‍या आरोपीविरुद्धही नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष तपास पथकाने जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून 18 चित्रफिती आणि 39 छायाचित्रे हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील आर्थिक पैलू तपासण्यास सुरुवात केली असून 21 एप्रिल रोजी आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने अधिक तपासासाठी पुन्हा कोठडीची मागणी केली जाणार आहे.
परतवाडा शहराला हादरवून सोडणार्‍या या घटनेत 15 वर्षीय पीडितेने पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखालील महिला पोलीस पथकासमोर आणि बाल कल्याण विभागाच्या अधिकार्‍यांच्या साक्षीने आपला सविस्तर जबाब नोंदवला आहे. अयान अहमदने समाज माध्यमांवर प्रसारित केलेल्या आक्षेपार्ह छायाचित्रांच्या पार्श्वभूमीवर ही साक्ष अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, पीडितेच्या जबाबात विनयभंगाचे स्पष्ट उल्लेख असून त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याच दरम्यान, पोलिसांनी उजेर खान इकबाल खान याच्यावरही कारवाईचा बडगा उगारला आहे. एका 16 वर्षीय मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून उजेर खानविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वारंवार समज देऊनही तो मुलीच्या संपर्कात राहून त्रास देत होता, असे निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी 6 नवीन भ्रमणध्वनी, एक संगणक, एक टॅबलेट आणि माहिती साठवण्याचे साधन जप्त केले आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवलेल्या साधनांपैकी 3 भ्रमणध्वनींमधील नष्ट झालेली माहिती पुन्हा मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. यातून अनेक आक्षेपार्ह चित्रफिती पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. 13 एप्रिलपासून सुरू असलेल्या या कारवाईत आतापर्यंत 8 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून 17 एप्रिल रोजी आणखी 10 संशयितांची सखोल चौकशी करण्यात आली आहे.
अयान अहमदच्या समाज माध्यमांवरील अनुयायांची संख्या 18 हजारांवरून एकदम 22 हजारांवर गेल्याने पोलिसांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे तो या माध्यमांच्या आधारे कोणाला ब्लॅकमेल करून पैसे उकळत होता का, यादृष्टीने त्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू झाली आहे. पोलीस विभागाने समाजातील इतर पीडित मुलींना न घाबरता पुढे येण्याचे आवाहन केले आहे. तक्रारदारांची नावे आणि ओळख पूर्णपणे गुप्त राखली जाईल, असे आश्वासनही पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button