असोरिया पेट्रोलपंप फायरिंग प्रकरणात 6 आरोपींवर मकोका

अमरावती शहरात 15 वर्षांनंतर मोठी कारवाई

20 जूनच्या घटनेत 18 आरोपींंवर गुन्ह्याची नोंद
शहर पोलीसांच्या संघटीत गुन्हेगारीविरोधात एडीजीकडून निर्णयास मंजुरी

अमरावती /22 सप्टेंबर – असोरिया पेट्रोलपंपावर 20 जूनच्या रात्री झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात अमरावती शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मोक्का लावला आहे. या प्रकरणात नागपुरी गेट पोलिस ठाण्यात 18 आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि गोळीबारासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान संघटित गुन्हेगारीची बाब समोर आल्यानंतर सहा आरोपींवर मोक्का लावण्याचा प्रस्ताव तयार करून मुंबईतील अपर पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला. मंजुरी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मोक्का कारवाई झालेल्या आरोपींमध्ये शेख मुन्ना शेख सलीम (32), सय्यद तौसिफ सय्यद नासिर (25), मो. सुफियान ऊर्फ गोलू मो. मन्नान (24), सय्यद अल्तमश सय्यद गफ्फार (23), सय्यद शोएब ऊर्फ फज्जू सय्यद गफ्फार (25) आणि अरबाज खान एहफाज खान (25) यांचा समावेश आहे. यापैकी पाच जण अंसारनगर परिसरातील तर अरबाज खान हा ताजनगर येथील रहिवासी आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर नागपुरी गेट पोलिसांनी तपासाला वेग दिला. पोलिस आयुक्तांच्या निर्देशानुसार आरोपींविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला. सहाय्यक पोलिस आयुक्त स्तरावर प्रस्तावाची छाननी करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो मुंबईतील अपर पोलिस महासंचालक कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मंजुरी मिळाल्यानंतर सहा आरोपींवर मोक्काची कारवाई करण्यात आली. अमरावती शहरात सुमारे दीड दशकानंतर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत झालेल्या या कारवाईमुळे प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त राकेश ओला, पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके आणि सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नागपुरी गेटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पथकप्रमुख पोलिस उपनिरीक्षक विकास मनपिया, पोलिस हवालदार इरफान रायलीवाले, प्रवीण ढेंगेकर, इमरान खान, मनीष यादव, मोहन चौव्हाण आणि शेखर गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Back to top button