सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांवर बंदी

 हायकोर्टाच्या आदेशाने गणेश मंडळांची चिंता वाढली

न्यायालयानेे राज्य सरकारला दिले आदेश

मुंबई /22 सप्टेंबर : राज्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम आहे. अशामध्ये अनेक गणेश मंडळांनी रोषणाई करत आकर्षक देखावे साकारले आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून राज्यात ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. डीजे बंदी असो किंवा मोठमोठ्याने वाजणारे लाऊडस्पीकर असो, सध्या यावरून दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. मुंबईत वाढते ध्वनी आणि वायूप्रदूषण रोखण्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. धार्मिक सण,उत्सव आणि मिरवणुकांमध्ये सार्वजनिक थाळी फटाके वाहण्यास बंदी घालण्याचे तसेच ढोलताशा पथकात हातोड्याने सिलिंडर वाजवण्यावरही बंदी घालण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर उत्सवात होणार्‍या मोठ्या आवाजाच्या मुद्द्यावर सुनावणी झाली. गणपती मंडपदेखील शांतता क्षेत्रात मोडू शकतात का? शाळा आणि रुग्णालय जसे शांतता स्थळात येतात तसेच हे गणपती मंडप येतात का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानेसुनावणीदरम्यान विचारला आहे.न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी म्हटले की, तुमचे अधिकारी फटाक्यांना परवानगी देतात. त्यांना माहीत पाहिजे त्यामुळे किती आवाज निर्माण होतो. तुम्ही एवढे सगळे नियम सांगितले, पण तरी त्याचे उल्लंघन केले जाते ते का होते? अशी विचारणाही त्यांनी केली. कोणी नियमाचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कारवाई करतो, त्या वस्तू आम्ही जप्त करतो, असे महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी सांगितले. यावर, कारवाईचा आकडा कुठे आहे? असे न्यायाधीशांनी विचारले. यावर महाधिवक्त्यांनी आमच्याकडे आकडा असल्याचे सांगितले.

Back to top button