एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

धामणगाव रेल्वेजवळील घटना, भरधाव वॅगनआर कार ट्रकवर आदळली
अमरावती /28 जून : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताने पाच जणांचा बळी घेतला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूरहून मुंबईकडे निघालेली वॅगनआर कार भरधाव ट्रकच्या मागे आदळल्याने हा भीषण अपघात झाला.
धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघात धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील चैनल क्रमांक 105 जवळ घडल्याचे सांगण्यात आले. दरम्यान अपघाताच्या उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, वॅगनआर कार चंद्रपूरहून मुंबईच्या दिशेने जात होती. याचवेळी पुढे धावणार्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. अपघात इतका भीषण होता की कारमधील पाचही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यू झालेले पाचही जण एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. दुर्दैवाने या अपघातात एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या बचाव पथकाने कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यानंतर सर्व मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. पण प्रथमदर्शनी हा अपघात वेगावरील नियंत्रण गमावल्याने झाला असल्याचे दिसत आहे. पण नेमके कारण पोलीस तपासानंतरच समोर येईल. दरम्यान, अपघातानंतर समृद्धी महामार्गावर काही काळ वाहतूक संथ झाली होती. मार्गावरील अपघातग्रस्त कार आणि ट्रकमुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, पोलिसांनी आणि बचाव पथकाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.




