राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण व अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर

एकल महिलांचा सन्मान, नशामुक्ती प्रदर्शन

महा. अंनिस अमरावती शहर शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद तायडे यांची सर्वानुमते निवड

अमरावती/28 जून: अमरावती येथील जवड नगरच्या महादेव मंदिर सभागृहात राजर्षी शाहू महाराज जयंती, आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन आणि विधवा व एकल महिला दिनाचे औचित्य साधून व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देणारा भव्य जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात समाजाला व्यसनमुक्त आणि विज्ञानाची कास धरणारा बनवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्वराज्य वस्तीस्तर संघ आणि विविध विभागांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्पनाताई राजुरकर होत्या. यावेळी जया संजय मांडवधरे, मिलिंद तांडे, मनीषा टाकसाळी, वंदना हरणे, रजनी सवाई, भूमिका पिंगुलकर, उमा इंगोले आणि सुरेखा रंगारी यांनी मार्गदर्शन केले. व्यसनाधीनतेमुळे होणारी कौटुंबिक वाताहत, वाढती गुन्हेगारी आणि अपघातांचे भयावह वास्तव मांडत वक्त्यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला. जया संजय मांडवधरे यांनी प्रत्येक घराघरातून व्यसनमुक्तीची चळवळ उभी करणे काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. याप्रसंगी सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल शिलाताई मोकळकर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या प्रदर्शनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले, ज्यामध्ये व्यसनांचे शारीरिक आणि मानसिक परिणाम सविस्तर मांडले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल मंदा धर यांनी केले तर सूत्रसंचालन मनिषा इंगोले यांनी केले. मंजू वासनिक यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अमरावती शहर शाखेची बैठक पार पडली, ज्यामध्ये मिलिंद तांडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. हे यश संपादन करण्यासाठी सचिन खोबरागडे, डॉ. संदीप महल्ले, विजया कराळे, आशिष देशमुख, दिगंबर मेश्राम, लक्ष्मण तडस, राधा तिडके, भाग्यश्री शामतकर, प्रमिला प्रधान, कविता दवाळे, हर्षा दाभाडे, सुनीता कोसरे, अर्चना गायकवाड, उज्ज्वला गडबले, रेखा दामले, रूपाली चोपकर, मेघा गावंडे, वैशाली हरणे, अनिता हरणे, नलिनी गजभिये, मीना वाकोडे, सुजाता गुलसुंदरे, कांचन मासोधकर, अनिता राऊत, शीतल मेश्राम, माधुरी धवने, अर्चना राऊत आणि राणी गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

Back to top button