संसदेत सर्व प्रश्नांची उत्तरे देणार : अमित शहा
चर्चा सुरू करा; लेक्चर नको, विद्यार्थ्यांवर गोळ्या कुणी चालवल्या सांगा ः राहुल गांधी

नवी दिल्ली/12 ऑगस्ट -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी म्हणाले, सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे, परंतु विरोधकांनी सभागृहाचे कामकाज चालू दिले पाहिजे. आज दुपारी 3 वाजता चर्चा सुरू होऊ द्या. मी सभागृहात उपस्थित राहीन, सर्वांचे म्हणणे ऐकून घेईन आणि उद्या दुपारी 3 वाजता सर्वांना उत्तर देईन.याला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, आधी त्यांनी हे स्पष्ट करावे की जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले. त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनात झालेल्या लाठीमारावर गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावे, अशी विरोधकांची मागणी आहे. गेल्या 20 दिवसांपासून लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले आहे. शहा सभागृहात उपस्थित राहत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
शहा यांनी सांगितले की, विरोधी पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज चालू देत नाही. संसदीय कामकाजात अडथळा आणला जातो, तेव्हा सभागृहात उपस्थित राहण्यात फारसा अर्थ उरत नाही. सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे. आता, चर्चेपासून नक्की कोण पळ काढत आहे, हे जनतेनेच ठरवले पाहिजे.आज दुपारी 3 वाजल्यापासून ते उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी सरकार सज्ज आहे. ते स्वतः सभागृहात उपस्थित राहतील,सर्वांचे म्हणणे ऐकून घेतील आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतील.
सरकारकडे लपवण्यासारखे काहीही नाही. केवळ या मुद्द्यावरच नव्हे, तर विरोधी पक्षाची चर्चा करण्याची इच्छा का नाही, या कारणांवरही चर्चा करण्यास सरकार तयार आहे.राहुल म्हणाले, विद्यार्थ्यांवर गोळ्या कोणी चालवल्या? खिळे लावलेल्या काठ्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे आदेश कोणी दिले? आमच्या मुलांवर गोळ्या झाडण्याचे आदेश अमित शहा यांनी दिले होते का? त्यांनी तसे केले असेल, तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.त्यांच्या घराबाहेर हजारो पोलीस कर्मचारी पहारा देत असतात. कोणताही विद्यार्थी त्यांच्या जवळ येऊ नये यासाठी 30 गाड्यांचा ताफा त्यांच्यासोबत असतो. अमित शहा गेल्या 20 दिवसांपासून गायब आहेत. गृहमंत्र्यांमध्ये हिंमत नाही. ते संसदेतही येऊ शकत नाहीत.




