आतापर्यतचे सर्व रेकॉर्ड मोडले; पश्चिम बंगालमध्ये 91 टक्के मतदान
तामिळनाडूतही 84.41 टक्के मतदारांनी बजावला हक्क

* सत्ता बदलणार की ममता बॅनर्जी पुन्हा येणार?
नवी दिल्ली/23 एप्रिल- पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झाले. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत 152 जागांवर 91. 46टक्के मतदान झाल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. या विधानसभा मतदारसंघात 2021 मध्ये 81.16 टक्के मतदान झाले होते. पश्चिम बंगालमधील मतदानाचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेत येणार की भाजप डाव साधणार? याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. गुरूवारी 16 जिल्ह्यातील 152 विधानसभा जागांसाठी मतदान झाले. 1478 उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये थेट टक्कर असून 44 हजार मतदान केंद्रावर मतदान पार पडले. 3 कोटींपेक्षा जास्त मतदारांनी हक्क बजावला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सायंकाळी सहा वाजेपर्यंत तामिळनाडूच्या 234 जागांवर 84.41 टक्के मतदान झाले यावर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक मतदानाची टक्केवारी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये नोंदवली गेली. भारतीय निवडणूक आयोग पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या प्रत्येक मतदाराला सलाम करतो.तमिळनाडूमध्ये 234 जागांवर एकूण 4023 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळेस राज्यात भरघोस मतदान झाले. यापूर्वी 2021 मध्ये 72.73 टक्के, 2016 मध्ये 74.24 टक्के आणि 2011 मध्ये 78.29 टक्के मतदान झाले होते. मात्र, यावेळेस तमिळनाडूमध्ये सर्व विक्रम मोडत मतदान झाले.
काही ठिकाणी हिंसाचार
पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दिवशी काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. कुमारगंज मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुवेंदू सरकार यांच्यावर हल्ला झाला. एका व्हिडिओमध्ये सुवेंदू सरकार आपल्या सुरक्षा रक्षकासह हल्ल्यातून वाचण्यासाठी पळताना दिसत आहेत. असे असूनही, जमाव त्यांना मारहाण करतच राहिला. बर्नपूरच्या रहमतनगर परिसरात आसनसोल दक्षिण मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. बंगालमधील इतर अनेक ठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याचे दिसले.




