कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

शेतात लावला गळफास

-नांदगाव पेठ येथील घटना
नांदगाव पेठ/ 30 मे : कर्जाच्या ओझ्याने त्रस्त असलेल्या एका शेतकर्‍याने शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. नरेंद्र उर्फ बापूराव सदावर्ते (45) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. नरेंद्र सदावर्ते हे फुलांची विक्रमी शेती करणारे शेतकरी म्हणून प्रसिद्ध होते.
काही वर्षांपूर्वी नरेंद्र सदावर्ते यांनी शेवती रोड वर असलेले स्वतःचे शेत विकले. ते मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून धडपडत होते. त्यांनी त्या पैश्यातून घर बांधले आणि काही पैसे मुलींच्या शिक्षणासाठी राखून ठेवले होते. अश्यातच पूर्वीची त्यांची शेती मक्तेदारीने घेऊन त्यामध्ये पुन्हा त्यांनी फुलशेती फुलविली होती. मात्र सततची नापिकी आणि जवळ असलेला पैसे निघून गेल्याने त्यांनी शेतीसाठी नातेवाईकांकडून तसेच बँकेकडून कर्ज घेतले होते. यावर्षी सुद्धा पाहिजे तसा भाव शेतमालाला मिळाला नाही. परिणामी गेल्या काही दिवसांपासून ते विवंचनेत होते.
घटनेच्या दिवशी सकाळी त्यांनी सर्व मित्रांची भेट घेतली आणि हसत खेळत सर्वांशी बोलून ते शेतात गेले. त्यांनी शेतात असलेल्या खोलीच्या खांबाला दोरी बांधून गळफास घेतला. सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास आजूबाजूला असलेल्या शेतकर्‍यांना हे दृश्य दिसल्यानंतर त्यांनी तातडीने ही बाब कुटुंबियांना व पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवाल. उत्तरीय तपासणी नंतर दुपारी स्थानिक मोक्षधाम मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असून मोठी मुलगी उच्च शिक्षण घेत आहे. घटनेने अनेकांना धक्का बसला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच खा. बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून कुटुंबियांचे सांत्वन केले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button